सोलापूर,दि.9 (जिमाका): सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 15 गावे, दक्षिण सोलापूर चार गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील 16 अशा 35 गावातून महामार्ग जाणार असून 5 जून 2022 पासून रोव्हरद्वारे मोजणी
होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सुरत-चेन्नई नवीन महामार्गाच्या मोजणी पूर्वतयारीचा आढावा श्री. शंभरकर यांनी नियोजन भवन येथे घेतला. बैठकीला उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपजिल्हाधिकारी तथा महामार्गाच्या सक्षम अधिकारी अरूणा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, अनिल विपत यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, सुरत-चेन्नई महामार्गासाठी तिन्ही तालुक्यातील जमिनीची मोजणी 5 जून ते 25 जून दरम्यान करण्यात येणार आहे. यासाठी 10 रोअर मशिनद्वारे ही मोजणी अचूकपणे करण्यात येणार आहे. या मशिनद्वारे एका दिवसात तीन किमी मोजणी होत असल्याने 15 दिवसात सर्व मोजणी पूर्ण होणार आहे. तिन्ही तालुक्यातील एकूण 642.1104 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपापली कामे चोखपणे पार पाडावीत.
मोजणीसाठी निवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांची मदत
तिन्ही तालुक्यातील गट सर्वसामान्य लोकांना कळविण्यात आले आहेत. मोजणीसाठी निवृत्त अधिकारी/कर्मचारी यांची मदत घेण्यात येणार आहे. 26 मे 2022 पर्यंत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. या हरकतीवर त्याचवेळी निर्णय देण्यात येणार आहे. यामुळे संबंधित सर्व विभागांनी 5 जूनपासून मोजणी सुरू होईल, याचे नियोजन करावे. मोजणी करताना कोणाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या. पाईपलाईन, विहीरी यांची माहिती घ्या. जिराईतचे क्षेत्र बागायत होता कामा नये, याची काळजी घ्या. झाडांची संख्या, इतर मालमत्ता याबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
रोअर मशिन या नवीन असल्याने मोजणी करणाऱ्यांना आणि इतरांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने बुधवारी बार्शी तालुका, गुरूवार अक्कलकोट आणि शुक्रवारी उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. आकडेमोड करणाऱ्यांनाही प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. संबंधित सर्व विभागांनी आपापले वेळेत योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले.
12 तासांचे अंतर होणार कमी
सुरत-चेन्नई हे अंतर 1290 किमी असून हे अंतर जाण्यासाठी 30 तास लागत होते. या महामार्गामुळे आता 18 तासात हे अंतर पार होणार आहे. 8200 कोटींचा हा प्रकल्प असून महामार्गामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. जमिनींच्या किंमती वाढून मिळणार आहे. महामार्गामुळे व्यापारी दृष्टीकोनात बदल होणार असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, वन विभागाच्या जमिनी अतिक्रमण करून कोणी त्याचा वापर करीत असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. मोजणीमध्ये सर्व उघड होणार आहे.
श्री. चिटणीस म्हणाले, रोअर मशिनबरोबर ड्रोनद्वारेही सर्व्हे होणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असल्याने प्रत्येक विभागांनी आपापली भूमिका निभावावी.
श्री. शिंदे म्हणाले, मोजणी करताना झाडे नमूद करताना कोणत्या प्रकारची झाडे आहेत. फळे देणारी आहेत की रोपे आहेत, याची नोंद घ्यावी. हेतूपुरस्कर रोपे लावणे बरोबर नाही, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. आपल्या साहित्याचा पंचनामा होत असताना शेतीचा मालक हा त्याठिकाणी असणे आवश्यक आहे.
श्रीमती गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे महामार्गाची माहिती दिली.