मंद्रूपचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा अनोखा आदर्श;लग्नात रक्तदान,वृक्ष वाचवा,स्त्रीभ्रूण हत्या रोखासह समाज प्रबोधनाचा संदेश
सोलापूर,दि १४ : विवाह सोहळा हा भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा पंधरावा संस्कार मानला जातो. हा सोहळा शानदार,जानदार होण्यासाठी पैशांची मोजदाद केली जात नाही. त्यामुळे अनेक विवाह सोहळ्यात पैशांची उधळपट्टी करून डामडौल केला जातो.मात्र आपल्या चिरंजीव व कन्येचा विवाह थाटामाटात करण्याबरोबरच त्याच मांडवात जनतेचे प्रबोधन आणि जनजागृती करून मंद्रूपचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां निलम हिचा विवाह राजूर (बु)ता, मुखेड जि.नांदेड येथील नामदेव गोंविदराव पुठ्ठेवाड यांचे यांचे कनिष्ठ चिरंजीव समीर ऊर्फ सुमित यांच्या बरोबर तर राजशेखर लिंबारे यांचे चिरंजीव स्वामीराज यांचा विवाह धर्मवाडी, पो. कडगंची, ता. आळंद,जि. कलबुरगी येथील शिवकुमार शंकर जमादार यांची सुकन्या चि.सौ.कां. अश्विनी हिच्या बरोबर शनिवारी, १४ मे २०२२ रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर कुमठे, येथील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात सनई चौघडयांच्या मंगल सूरात, हजारों नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.या विवाह सोहळ्यात आलेल्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळींची मने जिंकली ती सांस्कृतिक भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागताला असलेल्या गजराज आणि प्रांगणात भरविण्यात आलेल्या अनोख्या पोस्टर प्रदर्शनाने! सोलापूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांच्या सामाजिक विषयावरील प्रबोधनात्मक चित्र प्रदर्शनात रक्तदान जीवनदान, लोकसंख्या नियंत्रण काळाची गरज, सेव्ह एनव्हारमेन्ट, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, सेव्ह पेपर, भ्रष्ट्राचार थांबवा, पाणी हेच जीवन, बेटी बचाओ, बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, बुद्ध हवा युद्ध नको, ग्लोबल वार्मिंग, माझी वसुंधरा, नो वॉर, येणारं पाऊल स्वच्छतेसाठी, सर्वधर्म समभाव, सौर ऊर्जेचा वापर करा,झाडे लावा – झाडे जगवा,युक्रेन-रशिया युद्ध थांबवा,अफगाणिस्तान-तालिबान विषय आदी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या विषयांवर लावण्यात आलेल्या २० हून अधिक प्रिंट स्वरूपातील चित्रांनी वऱ्हाडी मंडळींवर मोहिनी घातली.याशिवाय कासव तसेच बैलगाडी या माध्यमातून शेती संस्कृतीचा ही संदेश देण्यात आला.सांस्कृतिक भवनात प्रवेश करतानाच सर्वप्रथम हे प्रदर्शन व नेत्रदीपक रांगोळी पाहूनच वऱ्हाडी मंडळी अक्षतेसाठी कार्यालयात पोहोचली. दिवसभर हजारो वऱ्हाडी मंडळींनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला तर पोस्टर आणि बैलगाडीसोबत सेल्फी घेण्याचा मोह वऱ्हाडी मंडळींना आवरता आले नाही.चित्रकार खरात यांनीसुद्धा या चित्रांचे महत्व सर्वांना पटवून सांगितले. या विवाह सोहळ्यासाठी श्री.सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी,आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने व शिवशरण पाटील, बाळासाहेब शेळके,सुरेश हसापुरे,अमर पाटील,गुरुसिद्ध म्हेत्रे, अप्पासाहेब काळे,चंद्रकांत खुपसंगे,संजीव पाटील, संजय देशमुख,दिलीप सिद्धे,बाळासाहेब मोरे, महादेव कोगनुरे,
उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ नितीन थेटे,
दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, बाजार समितीचे आणि सोसायटीचे संचालक यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी,कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी तहसीलदार लिंबारे यांच्या संवेदनशील मनाचे व या जन जागृतीपर उपक्रमाचे कौतुक केले.
सामाजिक बांधिलकी
जपण्याचा प्रयत्न !
आपण शासनाचे अधिकारी म्हणून काम पाहत आहोत.समाजाच्या जाणिवा आणि उणिवा आपण जाणतो.आज एका वेगळ्या समस्येतून आपण जात आहोत.पाणी,वीज,झाडांची मोठी समस्या व कमतरता जाणवत आहे.मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे आपल्या मुला-मुलींच्या विवाहाचे औचित्य साधून समाजापर्यंत एक सामाजिक संदेश जावा आणि त्यातून जनतेचे प्रबोधन व्हावे या उदात्त हेतून चित्रकार सचिन खरात यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा उपक्रम आपण राबविला आहे.
राजशेखर लिंबारे
अपर तहसीलदार, मंद्रूप
सचिन खरात यांच्याकडून
पाचशे रोपांचे वाटप
चित्रकार सचिन खरात यांनी माझी वसुंधरा अंतर्गत या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाचशे रोपांचे वाटप करून वृक्ष संवर्धनाला गती देण्याचे आवाहन केले.अधिकारी या रोपांची जपणूक करून त्याला मोठ्या वृक्षात रूपांतरित करण्यास हातभार लावतील असे खरात यांनी यावेळी बोलताना नमूद केले.