ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भक्तीपूर्ण वातावरणात नुतन काशी जगदगुरूंची अड्डपालखी,भर पावसातही हजारो भक्तगणांचा सहभाग

सोलापूर : काशी पीठाचे जगद्गुरु व बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डाॅ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य यांची भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखी काढण्यात आली. या सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील तसेच शहर जिल्ह्यातील हजारो भक्तगण सहभागी झाले होते.
वाराणसी येथील काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डाॅ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य यांची काशी पीठाचे 87 वे जगदगुरु म्हणून 13 मे रोजी काशी येथील जंगमवाडी मठात श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पट्टाभिषेक केला होता.
आपले मठाधीश जगदगुरु झाले याचा आनंद साजरा करावा आणि नुतन जगद्गुरु यांचे दर्शन व्हावे याउद्देशाने ही अड्डपालखी काढण्यात आल्याचे होटगी मठाचे संचालक शिवानंद पाटील यांनी सांगितले.
काल शुक्रवार दि. 20 मे रोजी दुपारी 5 वाजता नुतन जगदगुरु डाॅ. मल्लिकार्जून विश्वाराध्य जगदगुरू यांची अड्डपालकी बाळीवेस येथील मल्लिकार्जून मंदिर येथून निघाली. त्यानंतर चाटी गल्ली, मंगळवारपेठ, मधला मारूती, माणिकचौक, पंचकट्टा यामार्गे ती ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर येथे समाप्त करण्यात आली. यावेळी उपस्थित भक्तांनी दिलेल्या जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय …… जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय ……. जगद्गुरु डाॅ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.
मिरवणूकीच्या प्रारंभी जलकुंभ घेतलेल्या 101 सुवासिनी होत्या. त्यामागे बँड पथक होते. खास आंध्र प्रदेश वरून पुरवंत आपली कलाप्रकारांचे सादरीकरण करत होते. त्याचा मार्गावरील भक्तगण दर्शन घेऊन धन्य होत होते. पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना देखील मिरवणूकीतील भक्त आणि मार्गावरील भक्त यांच्या संख्या कमी झाली नाही.
यावेळी मंद्रूपचे रेणूक शिवाचार्य, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य, श्रीकंठ शिवाचार्य, होटगी मठाचे उत्तराधिकारी चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य यांच्यासह आ. विजयकुमार देशमुख आ. सचिन कल्याणशेट्टी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे, तम्मा मसरे, राजशेखर हिरेहब्बू, केदारनाथ उंबर्जे, अमर पाटील, सचिव शांतय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, बसवराज शास्त्री-हिरेमठ, शिवयोगी शास्त्री-होळीमठ, प्रभुराज विभुते, दिलीप दुलंगे, राजेंद्र गंगदे, राजशेखर बुरकुले आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!