दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा मुदतवाढ;अक्कलकोट बाजार समितीवर मात्र प्रशासकाची नियुक्ती
अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे.डिसेंबर २०२१ मध्ये या
बाजार समितीच्या संचालक मंडळाची
मुदत संपली होती.मात्र काही तांत्रिक
बाबींमुळे राज्यातील बाजार समितीच्या संचालक मंडळाना २२ एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती.यानंतर माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,सभापती म्हेत्रे आणि शंकर म्हेत्रे यांनी संचालक मंडळास पुन्हा मुदतवाढ मिळावी,यासाठी सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता यास शासनाने मुदतवाढ दिल्याची माहिती सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी दिली.
शासनाच्या नियमानुसार
दुधनी बाजार समितीतीच्या संचालक मंडळास आणखी मुदतवाढ मिळू शकते ही बाब लक्षात घेवून माजी मंत्री म्हेत्रे यांनी सहकार व
पणन मंत्री पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.यानंतर संबंधित विभागाकडून अखेर संचालक मंडळास २२ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.या दरम्यान निवडणुका होऊ शकतात किंवा निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देताना सहकार व पणन खात्याकडुन मुदतवाढ दिलेल्या कालावधीत संचालक मंडळास कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार नाहीत,हे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच धोरणात्मक निर्णय घ्यावयाची असल्यास त्याविषयी शासनाकडे पुर्वमान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.मुदतवाढ मिळाल्याची बातमी समजताच दुधनीसह तालुक्यातील म्हेत्रेप्रेमी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष
केला.
अक्कलकोटला प्रशासक
अन् दुधनीला मुदतवाढ
एकीकडे सर्व बाबींचा सुक्ष्म विचार करुन म्हेत्रे यांनी शासनाच्या नियमानुसार दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ मिळवली.मात्र दुसरीकडे अक्कलकोटच्या बाजार समितीवर १ जुनपासून सहाय्यक निबंधक शाम दडस यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.