अक्कलकोट, दि. २३ – अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा शिक्षणमहर्षी शिवशरण चनबसप्पा खेडगी यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने ६४ व्या वर्षी गुरुवारी ( दि. २३ ) पहाटे कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील खेडगी या त्यांच्या जन्मगावी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अक्कलकोट येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्कलकोटचे दानशूर तथा शिक्षणमहर्षी गेले,अशा भावना मान्यवरांनी व्यक्त
केल्या.शिवशरण खेडगी हे ‘मामा’ या नावाने ओळखले जात. तसेच प्रसिद्ध व्यापारी तथा ऑईल मिल मालक म्हणूनही त्यांची ओळख होती. खेडगी यांनी शिक्षण, व्यापार, सहकार, धार्मिक, शेती,उद्योग क्षेत्रात भरीव काम केले. खेडगी यांचा एक व्यापारी ते यशस्वी ऑईल मिल किंग, सोलापूर सिद्धेश्वर बँकेचे हॅट्रिक संचालक, शिक्षणमहर्षी, आदर्श शेतकरी, अष्टपैलू राजकारणी असा प्रवास थक्क करणारा आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री निर्माण करणाऱ्या खेडगी यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातील तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतले होते.येथील शैक्षणिक क्रांतित खेडगी कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. वडिल दानशूर कै. चनबसप्पा खेडगी यांच्या शिक्षणविषयक कल्पना पुत्र शिवशरण खेडगी यांनी प्रत्यक्षात अंमलात आणल्या होत्या. आपली बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि शिस्त या गुणांनी त्यांनी शैक्षणिक, धार्मिक, व्यापार व सामाजिक नेतृत्वाचा आदर्श समाजापुढे उभा केला होता. नावीन्यपूर्ण शिक्षण प्रणाली अंमलात आणण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा असायचा. त्यांनी अक्कलकोट नगरपरिषदेचे दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले. त्यांच्या पत्नी शोभा खेडगी यांना थेट नगराध्यक्षाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी करण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. अक्कलकोट शहर व तालुक्याच्या राजकारणावर त्यांची पकड होती.
यापूर्वीच त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती.बुधवारी दिवसभर खेडगी शिक्षण संकुलातील विविध विभागाच्या कामाची पाहणी करून पुढील कामाचे नियोजन केले होते. आणि संध्याकाळी खेडगी या गावी शेताच्या कामानिमित्त गेले होते. गुरुवारी पहाटे झोपेत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ८ च्या सुमारास त्यांचे पार्थिव अक्कलकोट येथील त्यांच्या विवेकानंद पार्क मधील निवासस्थानी आणण्यात आले. यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवर, त्यांचे हितचिंतक, कार्यकर्त्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.दुपारी एकच्या सुमारास त्यांचे पार्थिव घराच्या प्रांगणात दर्शनासाठी ठेवण्यात आले. राजकारणातील एक जिद्दी व चिकाटीचे व्यक्तिमत्व असलेल्या व समाजकारणातील न्याय देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मामानां शेवटचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. दोड्याळ रस्त्यावरील खेडगी खडी क्रेशरच्या प्रांगणात वीरशैव लिंगायत परंपरेनुसार अनेक धर्मगुरू व मान्यवरांच्या उपस्थितीत मामाचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते विधी केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनामूळे अष्टपैलू व्यक्तीमत्व हरपले आहे.त्यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी अनेकांना अश्रू देखील अनावर झाले.माजी नगराध्यक्ष कै. रेवणसिद्ध खेडगी यांचे ते बंधू होत.त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगराध्यक्षा शोभा, मुलगा माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा, मुलगी सिद्धम्मा, विजयालक्ष्मी,सून पवित्रा व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या अंत्ययात्रेत अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले, खासदार डाॕ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, नागणसूर, मैंदर्गी, करजगी, खेडगी मठाचे महास्वामीजी,आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दाराम म्हेञे, सिद्रामप्पा पाटील, पुणेच्या यशदाचे उपसंचालक डाॕ. मल्लिनाथ कलशेट्टी, सिध्दय्या स्वामी, दत्ताञय तानवडे, किरण देशमुख, संजीवकुमार पाटील,शंकर म्हेञे, मल्लिनाथ पाटील, राजशेखर शिवदारे, प्रकाश वाले, आनंद तानवडे, महेश इंगळे, दिलीप सिध्दे, अशपाक बळोरगी, शिवराज म्हेञे, प्रथमेश म्हेञे, मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, शिवसिध्द बुळ्ळा,संजय देशमुख, अमोलराजे भोसले, उत्तम गायकवाड, अविनाश मडिखांबे, एजाज मुत्तवली, महिबूब मुल्ला, डाॕ. सुवर्णा मलगोंडा, संतोष पराणे विविध महाविद्यालयाचे प्राचार्य आदिसह अनेक मान्यवर, हजारो नागरिक- महिला उपस्थित होते.
खेडगी महाविद्यालयाचे
वटवृक्षात रूपांतर
शिवशरण खेडगी यांनी १९९४ मध्ये अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर आजपर्यंत सुमारे २८ वर्षांमध्ये महाविद्यालय बरोबरच सोलापूरला कौटुंबिक सल्ला व सेवा केंद्र, मातोश्री नीलव्वाबाई खेडगी शिशु, प्राथमिक व माध्यमिक प्रशाला व सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूल सुरु करून अक्कलकोट शहर व तालुकावासीयांना केजी टू पीजी पर्यंतची शिक्षणाची सोय करून दिली. शेतकरी कुटुंबातील शेकडो गरीब व हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण दिले.खेडगी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना गणवेश सुरु करून गेल्या अनेक वर्षांपासून आजतागायत त्यांनी कायम ठेवला. त्यांच्या दूरदृष्टीच्या भरीव कामामुळे २८ वर्षांत या शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले.