अहमदाबाद : अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी यूपीए सरकारच्या कारभारावर मोठं भाष्य केलं आहे. कॉंग्रेसप्रणित मनमोहन सिंग सरकारच्या काळात देशाचा विकास ठप्प झाला, आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय घेतले जात नव्हते, असं धक्कादायक वक्तव्य करत मूर्ती यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली आहे.
नारायण मूर्ती म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्ती आहेत. त्यांच्याद्दल प्रचंड आदर आहे. परंतु त्यांच्या कार्यकाळात आर्थिक बाबींसंदर्भात निर्णय घेतले जात नव्हते. त्यामुळंच सर्व गोष्टी घडत गेल्या, त्या का घडल्या, याबद्दल मला कल्पना नाही, असं वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केलं आहे. याशिवाय युवा पिढीच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ शकते, आपण चीनचा स्पर्धक बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.