धक्कादायक ! पोलीस अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाची लाखाची रोकड लंपास, भरदिवसा शिवाजी महाराज चौकातील घटना
सोलापूर, दि. २४- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका इसमाने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाची एक लाखाची रोकड लंपास केली. याबाबत शिवबसप्पा मलकप्पा विजापुरे (वय ८२, रा. कुरनूर, ता. अक्कलकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजापुरे हे तारण ठेवलेले सोने सोडविण्याकरता एक लाख रुपये घेऊन निघाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आकांक्षा मोबाइल शॉपीसमोर आले असता एक इसम त्यांच्याजवळ आला व त्याने मी पोलीस अधिकारी आहे, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही तोंडाला मास्क का लावला नाही, दारू प्यायलात का, अशी विचारणा करून दारूची बाटली कोठे ठेवली आहे, ती दाखवा, असे म्हणत त्याने फिर्यादीची तपासणी केली. त्यांच्या खिशातील एक लाखाची रोकड काढून घेऊन त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी विजापुरे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी फसवणुकीची मोठी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यातचं सरस्वती चौकात एका होमगार्डने पोलीस असल्याचे सांगून वाहनधारक व फुटाणे विक्रेत्याकडून सातशे रुपये घेतले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली आहे.