तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.७ : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील परमपूज्य बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या ९० व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त शनिवार दि.८ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ११ हजार सुहासिनी ओटी भरणे, ७ हजार जंगम गणाराधना, सामूहिक विवाह आणि लाखो भक्तांना तूप पुरण पोळीचे महाप्रसाद वितरण होणार आहे, अशी माहिती नागणसुर विरक्त मठाचे परमपूज्य डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामिजी यांनी दिली आहे.
पहाटे ६ वाजता महारुद्रभिषेक,९ वाजता षटस्थळ ध्वजारोहण, सामूहिक विवाह आणि धर्मसभा होणार आहे. नंतर ११ वाजता ११ हजार सुहासिनीना ओटी भरण्याचे कार्यक्रम, ७ हजार जंगम गणाराधना झाल्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश समवेत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सद्भक्ताना तूप,पुरणपोळीचे महाप्रसाद वाटप होणार आहे.
रविवारी सायंकाळी ५ वाजता बसवलिंग महास्वामीजीच्या धर्मग्रंथांची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे. या मिरवणुकीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम बरोबर लेझीम, टिपरी, झांज, भजन, विविध सांस्कृतिक कला मंडळाकडून कलासंघ सहभागी होणार आहे.दोन्ही दिवशी सर्व सद्भक्तना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आळी आहे.गावातील प्रमुख युवक मंडळाकडून ठिक- ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय १६ सप्टेंबर पासून गावात दररोज बसवलिंगेश्वर महास्वामीजींचे जीवन चरित्र पुराण, रक्तदान शिबिर,आधार कार्ड, बँक खाते काढणे, रांगोळी स्पर्धा, सारेगमप संगीत कार्यक्रम संपन्न झाले.
विशेष म्हणजे नागणसुर गावातील चालक मालक संघटनेकडून पुण्यस्मरण कार्यक्रमाला येणाऱ्या भक्तांना नागणसुर ते अक्कलकोट, सोलापूर, हैद्रा, तोळनूर, गुरववाडी, नविदगी, माशाळ, करजगी, होसुर, मणूर, इंडी, अक्कलकोट स्टेशन, जेवूर आदी गावातून येणाऱ्या भक्तांना मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. बसवा ऑक्वाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी जास्तीजास्त सद्भक्त उपस्थित राहून श्री गुरुकृपेस पात्र व्हावे, असे आवाहन डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी आणि नागणसुर ग्रामस्थांनी केले आहे.