अक्कलकोट, दि.२४ : ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना फडामध्ये जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर, शेतमजूर यांच्या मुलांना उसाच्या फडात जाऊन दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.
कारंजा चौक नवरात्र उत्सव समितीचे प्रमुख सुधीर माळशेट्टी यांच्या संकल्पनेतून शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर, दयानंद फताटे यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप केले.साखर कारखानदारीतील पहिली पायरी ऊस तोडणी कामगार असून पोटासाठी ऐन दिवाळीच्या सणात घरांपासून-नातलगांपासून शेकडो किलोमीटर दूर येऊन कडाक्याच्या थंडीमध्ये ऊस तोडणीचे काम केल्याने दिवाळी साजरी करणे अवघड होते. त्यांना ही दिवाळी साजरी करता यावी यासाठी सुधीर माळशेट्टी यांनी थेट ऊसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी फराळाचे कीट वाटप केले.
अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी, रामपूर,बोरी उमरगे, बावकरवाडी,चपळगाव या भागातील ऊस तोड कामगाराच्या सुमारे पाचशे मुलांची दिवाळी गोड करण्यात आली. या उपक्रमासाठी कारंजा चौक नवरात्र उत्सव समितीचे कार्याध्यक्ष केदार माळशेट्टी, डॉ. राजू मलंग,नागेश कोनापुरे,म्हाळप्पा पुजारी, कुमारप्पा दुलंगे यांनी परिश्रम घेतले.