मुंबई : काही दिवसांपूर्वीच दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ऐनवेळी गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरात प्रस्तावित असेलला टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातच्या वडोदऱ्यात हलवण्यात आला आहे. त्यानंतर आता राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं यावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरातील मिहानमधील सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प तेलंगणाच्या हैदराबादमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल १ हजार १८५ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणार असल्यानं यावरून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. विदर्भात आधीच रोजगाराची वानवा असताना एकामागून एक दोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्यानं तरुणांमध्ये आक्रोश असल्याचं पाहायला मिळत आहे