मातोश्री साखर कारखान्यास येणाऱ्या ऊसाला २२०० रुपयेचा पहिला हप्ता मिळणार : म्हेत्रे, प्रलंबित हप्ते नोव्हेंबरमध्ये खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ,दि.३० : रूद्देवाडी ता.अक्कलकोट येथील मातोश्री लक्ष्मी को.जन इंडस्ट्रीज लि.कारखान्याच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात २२०० रूपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी दर पंधरवड्यात बिले अदा करण्यात येतील, असे चेअरमन सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, कारखान्याच्या निर्मीतीपासून संस्थेकडून शेतकऱ्यांसाठी विधायक उपक्रम राबविले आहेत. मागील वर्षी म्हेत्रे परिवारावर एकापाठोपाठ एक दुःखद प्रसंग ओढविल्याने बिले अदा करण्यात वेळ झाला. परंतु शेतकऱ्यांच्या सहकार्याप्रती विश्वासामुळे मागील वर्षी साडेपाच मेट्रिक टन ऊसाचे गाळप यशस्वीरित्या पुर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षी पाऊस मुबलक झाल्याने ऊसतोडणीच्या प्रक्रियेत अडथळे आले असले तरी गाळपासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. यावर्षी आठ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असल्याचे सिध्दाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्यकारी संचालक शिवराज म्हेत्रे, एज्युकेटेड डायरेक्टर बाळासाहेब कुठे ,शेती तज्ञ्या मार्गदर्शक गुरूनाथ लोहार, जनरल मॅनेजर रावसाहेब गदादे, केन मॅनेजर खंडेराया व्हसुरे, डेप्युटी केन मॅनेजर सिद्राम गुरव,चीफ केमेस्ट माशट्टी आदी उपस्थित होते.
थकित हप्त्यांची रक्कम नोव्हेंबरपर्यंत
सन २०२०-२१ मधील गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना ५० रूपये तर सन २०१८-१९ मधील शेतकऱ्यांना २०० रूपयां राहीलेला हप्ता खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पुर्ण होईल.आजवर म्हेत्रे परिवारावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी ऊस दिले आहे.यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर ऊसाचा पुरवठा करून कारखान्याची वाटचाल सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे – शिवराज म्हेत्रे, तज्ञ संचालक,मातोश्री शुगर