टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल राज ठाकरे यांनी मांडली भूमिका, म्हणाले पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे..!
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातला गेल्याबद्दलची भूमिका मांडली आहे. “पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “बाहेर गेला म्हणजे गुजरातमध्ये गेला. माझी मागची सगळी भाषणं काढून बघितली तर माझं पहिल्यापासूनच मत असंच होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान मुलांसारखं असलं पाहिजे. महाराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता आणि तो आसामला गेला असता, तर मला वाईट वाटलं नसतं” असे सांगत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना जबाबदारीची जाणीवही करून दिली.
वाईट या गोष्टीचं वाटतंय की, जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो गुजरातलाच जातोय. मला असं वाटतंय की, पंतप्रधानांनी स्वतः याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट गुजरातकडे जात असेल अन् राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्र बद्दल बोलतो तेव्हा त्याला संकुचित म्हणण्या सारखं काय आहे?”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल विचार केला पाहिजे. प्रत्येक राज्यात विकास झाला पाहिजे, प्रत्येक राज्य मोठे झाले पाहिजे. लोकांना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जावे लागण्याची गरज भासली पाही पाहिजे. त्या त्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जर रोजगार मिळाला तर ते इतर राज्यांवर ओझे होणार नाही, असे सांगतानाच महाराष्ट्र हे उद्योगांच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा खूप पुढे आहे. महाराष्ट्र नेहमीच प्रगती पथावर आहे, उद्योगपतींना महाराष्ट्र जास्त सोयीस्कर ठरले आहे. प्रकल्पांना सगळे राजकारण म्हणून न पाहता केवळ विकास म्हणून पाहायला हवे. महाराष्ट्र हा उद्योगांच्या बाबतीत अग्रेसर आहे. प्रत्येक उद्योगपतींना महाराश्ट्रात सर्व सोयी सुविधा मिळत आहे. मात्र पंतप्रधानांनी एकाच राज्याचा विचार न करता सर्व देशाचा विचारद करावा असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे