राजस्थान : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात यापूर्वीही अंतर्गत सत्ता संघर्ष पाहायला मिळाला होता. आता हा संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सचिन पायलट यांनी केलेल्या सूचक विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेहलोत हेही गुलाबनबी आझाद यांच्या मार्गावर आहेत का ? आझाद यांच्याप्रमाणे गेहलोतही काँग्रेस सोडणार का ? असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
राजस्थानातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एकमेकांचे कौतुक केले. त्यानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सूचक विधान केले आहे. पंतप्रधानांनी असेच कौतुक गुलाम नबी आझाद यांचे केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाने ही घटना सहजपणे घेऊ नये, असे पायलट यांनी म्हटले आहे. अप्रत्यक्षपणे आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत गेहलोत हेही आझाद यांच्या मार्गावर आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राजस्थानच्या बासवाड जिह्यातील मानगडधाम येथे काल एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री गेहलोत एका व्यासपीठावर होते. यावेळी गेहलोत यांनी मोदींचे कौतुक करताना ‘पंतप्रधान जगात ज्या ज्या ठिकाणी जातात तेथे सन्मान होतो’ असे सांगितले. त्यावर मोदींनीही गेहलोत यांचे कौतुक केले. ‘अशोक गेहलोत आणि मी मुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केले आहे. ते सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री आणि अनुभवी राजकारणी आहेत.’ असे मोदी म्हणाले होते.