नेहरूंच्या कार्यकाळात बारावर्षे भारताची गोपनीय माहिती ब्रिटीशांपर्यंत पोहोचत राहिली, रणजीत सावरकर यांनी चढवला राहुल गांधीवर हल्लाबोल
मुंबई : वि. दा. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. नेहरूंचा पुनर्जन्म राहुल गांधी म्हणून झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या चुका उघड करणे ही माझी जबाबदारी बनली आहे. नेहरूंच्या कार्यकाळात 12 वर्षे भारताची गोपनीय माहिती ब्रिटीशांपर्यंत पोहोचत राहिली. जर आम्ही आता प्रश्न विचारले नाहीत, तर भविष्यात देशाची माहिती इटलीला पाठवली जाईल, अशा शब्दांत रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला.
रणजीत सावरकर म्हणाले, वीर सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य करण्याची राहुल गांधींना जुनी सवय आहे. 2017 मध्येही त्यांनी असेच विधान केले होते. असे वक्तव्य केल्यानंतर ते वर्ष-दीड वर्ष गप्प बसतात. यापूर्वीही त्यांनी असेच विधान केले होते, त्यानंतर मी 2017 मध्ये गुन्हा नोंदवला आणि त्याला पोलिस चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास भाग पाडले. आताच्या त्यांच्या वक्तव्या प्रकरणी मी राहुल गांधींना भोईवाडा न्यायालयात (मुंबई) हजर राहण्यास भाग पाडणार आहे.
रणजीत सावरकर म्हणाले, राहुल गांधी जेव्हाही कोर्टात हजर होतात तेव्हा माफी मागतात. त्यांनी न्यायालयात अनेकदा माफी मागितली आहे. ‘महात्मा गांधींच्या हत्येत संघ परिवाराचा हात होता’, भिवंडीत केलेल्या या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींनी भिवंडी कोर्टात माफी मागितली आहे. त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले आहे. याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केली आहे. मला खात्री आहे की त्यांना या प्रकरणातही माफी मागावी लागेल.