मुंबई : भाजपचे निलेश राणे आणि नितेश हे राणे बंधू विविध मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला वारंवार फैलावर घेताना दिसतात. यावेळी निलेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे सरकारवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला आहे.
”अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला.”
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. यावेळी त्यांनी शाळा आणि लोकल ट्रेन इतक्यात सुरु करू नयेत, असे सांगितले होते. तसेच दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्याचेही त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला धारेवर धरले. शिवसेनेत सगळेच एकापेक्षा एक विद्वान भरलेत. सर्वात आधी दारुची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झालेत? याची यादी जारी करा’, असा टोला निलेश यांनी पेडणेकर यांना लगावला आहे.