गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी ; भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी गांधीनगरला रवाना होणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच गुजरात दौरा असणार आहे.
गुजरात सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात भूपेंद्र पटेल हे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातील तब्बल आठ मंत्र्यांना डच्चू देण्याचा निर्णय भाजप नेतृत्त्वानं घेतला आहे. भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात २५ आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील. त्यात काही तरुण चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आज गांधीनगरमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक राज्यांतील नेते हजेरी लावणार आहेत. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ते ठाण्यातून गुजरातसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.