ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत मध्यप्रदेशातील कॉँग्रेस नेत्याचे खळबळजनक विधान

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पवईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी मंत्री राजा पटेरिया म्हणाले की, देशाच्या संविधानाला आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढायचं असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी तयार रहावं लागणार आहे. सध्या देशात राजकीय सौहार्दाचं वातावरण नाहीसं होत असून जातीधर्मांमध्ये फूट पाडली जात आहे. त्यामुळं राजकारणात सकारात्मक बदल होईल, असं वाटत नाहीये. राजकारणात आरोप-प्रत्यारोप करताना नेत्यांच्या भाषेचा स्तर खालावत असून त्यामुळं हे बदलायचं असेल तर नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार रहावं लागणार असल्याचं वक्तव्य राजा पटेरिया यांनी केलं आहे.

देश आणि देशातील संविधान वाचवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार रहायला हवं, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी केलं आहे. त्यामुळं या वक्तव्यावरून राजकीय वादंग पेटलं असून मध्यप्रदेश सरकारनं पटेरियावर गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळं आता पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय वादंग पेटलं आहे.

राजा पटेरिया यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी निषेध केला असून पटेरिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. याशिवाय त्यांनी पन्नाच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचेही निर्देश दिले आहेत. राजा पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं हे सिद्ध होतं की काँग्रेस ही महात्मा गांधींच्या नाही तर इटलीतील मुसोलिनीच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. भारत जोडो यात्रेत कन्हैया कुमार, स्वरा भास्कर आणि सुशांत सिंह चालत आहेत, त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला असून मोदींच्या हत्येसाठी काँग्रेस षडयंत्र करत असल्याचा आरोप गृहमंत्री मिश्रा यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!