ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाडा, विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे;कामकाज सल्लागार समिती बैठकीत अजित पवार यांची मागणी

मुंबई, दि. १३ डिसेंबर – कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. दरम्यान विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर येथील पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्ष, तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केले.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधान भवनात झाली. बैठकीला विधानसभा अध्यक्ष डॉ. राहूल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरै व्हावे, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा. विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरु व्हावे, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!