ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसने राजीव गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून चीनी सरकारकडून पैसे घेतला – गृहमंत्री अमित शहा

दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर चीनकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. गृहमंत्री शहांच्या आरोपांमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काँग्रेस त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये आठ आणि नऊ डिसेंबरला भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या घटनेमुळं प्रश्नोत्तरांच्या तासाला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आम्ही यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की या विषयावर संसदेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह उत्तर देतील.

२००५ आणि २००६ साली राजीव गांधी फाऊडेशनला चीनी दूतावासाकडून एक कोटी ३५ लाख रुपयांचा अनुदान मिळाला आहे. या फाऊंडेशनची नोंदणी सामाजिक कार्यांसाठी केलेली आहे, परंतु चीनकडून मिळालेल्या पैशांचा वापर भारत आणि चीन संबंधांसंदर्भातील शोधकार्यांसाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा करत अमित शहांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.

१९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धानंतर चीनने भारताची हजारो हेक्टर जमीन हडपली असून नेहरुंच्या चीनी प्रेमाखातर भारताला संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी समितीचं सदस्यत्वही मिळालं नाही. ज्यावेळी गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य चीनी सैन्याशी भिडत होते त्यावेळी चीनी दूतावासात स्नेहभोजनाचं आयोजन कुणी केलं होतं?, चीनने अरुणाचलवर दावा सांगितल्यानंतर काँग्रेसनं तेथील चालू बांधकाम का बंद पाडलं?, अरुणाचलमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना चीनी सरकारनं व्हिजा नाकारला होता, त्यावर काँग्रेसनं काय केलं?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!