ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कासाळगंगा प्रकल्प लागला बोलू ! नदी संवाद यात्रेसाठी एकवटला अवघा गाव

सोलापूर – राष्ट्रीय जल पुरस्कार विजेता कासाळगंगा प्रकल्प बोलू लागला. निमित्त होते, महाराष्ट्र शासनाच्या ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत आयोजित निबंध, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे. लोकसहभागातून पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची उपनदी झालेल्या कासाळगंगा पुनर्जीवित प्रकल्पामुळे काय फायदे झाले आहेत, याविषयी विद्यार्थी व्यक्त झालेत. त्याचप्रमाणे समाजाला नदीशी जोडण्यासाठीच्या नदी संवाद यात्रेसाठी अवघा गाव एकवटला होता. नदी संवाद यात्रेच्या अनुषंगाने कटफळ, चिकमहूद, महूद बुद्रूक (ता. सांगोला) येथे काढण्यात आलेल्या प्रभात फेऱ्यांमधून ‘जल है जीवन’, ‘जल है तो कल है’, असा जयघोष करत परिसर दुमदुमून सोडण्यात आला.

कासाळगंगाचे उगमस्थान असलेल्या कटफळ (ता. सांगोला) येथे नदी संवाद यात्रेचा शुभारंभ सांगोलाचे तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी पुण्याच्या ‘यशदा’चे माजी संचालक डॉ. सुमंत पांडे, पुण्याचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी जगण्यासाठी आवश्‍यक असलेले शाश्‍वत पाणी, पर्यावरण याबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून कासाळगंगा प्रकल्पामध्ये डॉ. पांडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. कासाळगंगा समन्वयक बाळासाहेब ढाळे यांनी कासाळगंगा अविरल, निर्मळ वाहण्यासाठी सगळ्यांनी एकजूट दाखवावी ,अशी अपेक्षा व्यक्त केली. कटफळचे सरपंच दादासाहेब कोळेकर, उपसरपंच नारायण बंडगर, ग्रामसेवक बी. ए. नरळे, मुख्याध्यापक एम. बी. बंडगर, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, शहाजी खरात, बापू चव्हाण, दीपक धांडोरे आदी उपस्थित होते.

चिकमहूदमध्ये कलश पूजनावेळी हळदी-कुंकू

चिकमहूद (ता. सांगोला) येथे विद्यार्थ्यांनी नदी संवाद यात्रेतंर्गत प्रभात फेरी काढली. तसेच कलश पूजनावेळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम झाला. याही गावात निबंध, रांगोळी, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सरपंच सुशिला कदम, उपसरपंच आक्काबाई भोसले, तलाठी श्री. तनमोरे, ग्रामविकास अधिकारी आत्माराम कोळी, वैद्यकीय अधिकारी श्री. खांडेकर, कृषि पर्यवेक्षक श्री. जाधव, मंडल कृषि अधिकारी श्री. अभंग, मृदसंधारण अधिकारी श्री. कुलकर्णी, जिल्हा परिषद बांधकामचे श्री. थिटे, वनविभागाच्या अधिकारी इंगोले आदि उपस्थित होते.

महूदमधील आनंदोत्सवात ग्रामस्थ सहभागी

जिल्हा परिषद शाळा आणि रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे नेहमी समाजाला नदीशी जोडा हे नेहमी सांगतात. त्याचा प्रत्यय स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कासाळगंगाचे फायदे या विषयावर साकारलेल्या कलाकृतीतून आला. सांगोला गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे, सरपंच संजीवनी लुबाळ, उपसरपंच वर्षा महाजन, संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे, शंकर मेटकरी, समन्वयक बाळासाहेब ढाळे, आर. डी. देशमुख, माजी उपसरपंच दिलीप नागणे, लिंगदेव येडगे, संतोष पाटील यांच्यासह वन, बांधकाम, कृषी, मृदसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कलश आणि जलपूजनाचा कार्यक्रम झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!