सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदारसंघातील हद्दवाढ भागातील आ. सुभाष देशमुख यांनी सूचवलेल्या कामांना महापालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत 10 कोटींचा निधी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आहे. प्रशासक काळात हा निधी कामाच्या नावाच्या यादीनुसार मंजूर करण्यात आल्याने विकासकामांना गती येणार आहे.
सध्या महापालिकेवर प्रशासकराज आहे. याच दरम्यान आ. सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदारसंघातील हद्दवाढ भागातील विविध कामांसाठी आयुक्त तथा प्रशासकाकडे निधी मागितला होता. आयुक्तांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. आ. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नागपूर अधिवेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आद्यक्रमाने या कामांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे आ. देशमुख यांनी हा निधी कामाच्या नावाच्या यादीनुसार मंजूर केल्याने इतरत्र हा निधी पळवला जाणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. या निधीमुळे हद्दवाढ भागातील विकासकामांना गती येणार आहे. दक्षिण मतदारसंघात येणार्या हद्दवाढ भागात प्रभाग 19 ते 26 मधील 117 कामांसाठी आ. देशमुख यांनी 10 कोटींचा निधी खेचून आणला आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, रस्ते करणे, डे्रेनेज करणे, फरशीकरण करणे, तारेचे कंपौंड टाकणे, पोल टाकणे, पथदिव्यांसाठी तार टाकणे, स्विच बोर्ड बसवणे आदी कामांचा समावेश आहे. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा निधी मंजूर करून आणल्याने दक्षिणमधील सर्व नगरसेवकांनी आ. देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.
हद्दवाढच्या विकासासाठी प्रयत्न सुरूच राहणार
दक्षिणमधील हद्दवाभागातील विविध कामांसाठी शानसाकडून 10 कोटी रूपये नव्याने मंजूर झाले आहेत. लवकरच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामांना सुरुवात केली जाईल. हद्दवाढ भागाच्या विकासाच्या दृष्टीने आपले प्रयत्न यापुढेही कायम राहतील, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले