दुधनी : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या सरकारी महामंडळांचं खाजगीकरण करण्यात येऊ नये, या मागणीसाठी राज्यातील वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांमध्ये मध्यरात्री तीन वाजेपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्येही लाईट गेल्यानं मोबाईल आणि लॅपटॉपची चार्जिंग कशी करायची?, हा प्रश्न आता लोकांसमोर उभा राहिला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारनं अदानी समुहाला वीज वितरण परवाना देण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, औरंगाबाद, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमधील वीज कर्मचारी संपावर गेल्यामुळं वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यानंतर आता वीज कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलनं करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.
वीज कर्मचारी संपावर गेलेले असल्याने महावितरणनं संपकाळात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा उभी केलेली असतानाही वीज गायब झाल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आता संपाच्या पहिल्याच दिवशी अशी स्थिती असेल तर पुढील दोन दिवस लाईटविना कसे काढायचे?, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे