उजनीचे पाणी आलेले नसताना इतर गावांच्या योजना कुरनूर धरणावरून कशाला ? सरपंच व्यंकट मोरे यांचा सवाल,उद्याच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेची अपेक्षा
अक्कलकोट, दि.६ : उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणण्याची योजना प्रलंबित असताना इतर गावांच्या योजना कुरनूर धरणावरून कशासाठी ? असा सवाल सरपंच व्यंकट मोरे यांनी उपस्थित केला आहे.याबाबत
उद्या (शनिवारी) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरवर्षी बैठक होते पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते पण इतर गोष्टींबाबत काही निर्णय होत नाहीत,असेही ते म्हणाले. धरण होत असताना कुरनूर व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा त्याग करून या तालुक्यासाठी,धरणाच्या निर्मितीसाठी मोठे योगदान दिले आहे परंतु आज पाणी
बघून त्यावर डल्ला मारण्याचे काम काही लोकांचे सुरू आहे.या धरणावर कुरनूर व आजूबाजूच्या गावांसाठी पाणीपुरवठयाच्या योजना अवलंबून आहेत.शेतकऱ्यांनाही या धरणाची गरज आहे परंतु अलीकडच्या
काळात या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना राबवून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे.पहिल्यांदा अक्कलकोटची जलवाहिनी झाली.आता पुन्हा समर्थनगरची जलवाहिनी होत आहे.वळसंग आणि दहिटणे गावाचा पाणीपुरवठाही या धरणावर प्रस्तावित आहे. असे जर होत गेले तर धरण उशाला कोरड घशाला अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही.स्थानिकांचा विचार होणार की नाही याबाबत उद्याच्या बैठकीत गांभीर्याने चर्चा होणे अपेक्षित आहे.वास्तविक पाहता कुरनूर धरण पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.पाऊस पडला नाही तर हे धरण पूर्णपणे कोरडे राहते अशा स्थितीमध्ये परिसरातील लोकांना पाणीटंचाई निर्माण होते परंतु आता काही गावांच्या पाणीपुरवठा योजना या धरणावर होत असल्याने आम्ही करायचे काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.पाणी सोडण्यास विरोध नाही परंतु पाणी सोडण्याबरोबर इतर काही योजना धरणावर लादल्या जात आहेत त्याचा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करावा.आधी एकरूख उपसा सिंचन योजना पूर्ण करावी. उजनीचे पाणी धरणात आणावे मगच या योजना राबवा,अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून बावकरवाडी ते कुरनूर धरण हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.याकडे ना पाटबंधारे विभागाचे लक्ष आहे ना इतर कोणाचे.कुरनूर धरण म्हणजे तसे पाहिले तर राष्ट्रीय संपत्ती आहे असे असताना इतकी बेफिकिरी या विभागाकडून का होते याचे
कोडे उलगडले नाही याचा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे.या बैठकीत केवळ पाणी सोडण्याचे नियोजन करून चालणार नाही तर त्या भोवती असणाऱ्या समस्या सोडण्याबाबत विचार करावा लागेल. या धरणाची साठवण क्षमता ८२२ दशलक्ष घनफुट आहे उपलब्ध पाणी आणि उपसा केले जाणारे पाणी याचा अभ्यास करावा लागेल अन्यथा उजनी धरणासारखी परिस्थिती या धरणाची सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे आधी उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणामध्ये आणून टाकावे मगच इतर योजना या धरणावरून राबवाव्यात,अशी आमची ग्रामपंचायतीची देखील मागणी आहे,असे सरपंच व्यंकट
मोरे यांनी सांगितले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे, उपसरपंच आयुब तांबोळी,संभाजी बेडगे, किशोर सुरवसे, स्वामीराव सुरवसे, लक्ष्मण शिंगटे,अमर मोरे आदी उपस्थित होते.