इच्छाशक्ती असली की सर्व काही होतं; नाईकवाडी गल्लीत नन्नु कोरबुंनी करून दाखविले ! ‘हर घर,हर नल’ चा पॅटर्न ठरला यशस्वी
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट शहरात सध्या आठ दिवसात पाणी आहे परंतु भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष नन्नु कोरबू यांनी मात्र आपल्या भागात येणाऱ्या दोन हजार लोक वस्तीला स्वतंत्र बोअर मारून ‘हर घर,हर नल’ योजना प्रभावीपणे राबवून पाण्याचा प्रश्न निकाली काढला आहे.त्यांच्या
या पॅटर्नची अक्कलकोट शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.अक्कलकोट शहराचा पाणी प्रश्न वर्षानुवर्षांपासून तसाच आहे.लोक सहनशील आहेत.त्यामुळे तो सोडवण्यास कोणी मनापासून पुढाकार घेत नाही.अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवायचा
कसा याचा विचार करत वैतागून कोरबु यांनी नाईकवाडी गल्ली,टिळक गल्ली,कुंभार गल्ली,मशिद गल्ली, शिर्के वाडा, मानकरी वाडा,बेडर गल्लीतील मेलकरी भाग अशा साधारण दोन हजार लोकवस्तीच्या भागाला नाईकवाडी गल्ली येथे स्वखर्चातून बोअर मारून घरोघरी नळजोडणी करून दिली आहे.आता शंभरच्यावर नळ कनेक्शन आहेत.यावर देखरेखीसाठी खास शकील नाईकवाडी यांची नियुक्ती करून पाणी वितरणाची जबाबदारी त्यांच्याकडे दिले आहे.आज त्याठिकाणी २४ तास पाण्याची सोय
उपलब्ध करून दिली आहे.पहाटे पाच ते
रात्री उशिरापर्यंत नागरिकांना मुबलक पाणी
मिळत आहे.गेल्या आठ महिन्यापासून हा उपक्रम सुरू असल्याने महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे.ही योजना राबवत असताना स्वखर्चातून
त्यांनी आता पर्यंत ११ लाख रुपये खर्च केले आहेत.ही बाब आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना कळताच त्यांनीही आमदार निधीतून साडेपाच लाखाचा निधी दिला आहे.यात
दोन हजार लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या प्रस्तावित आहेत.अक्कलकोट शहराच्या अनेक भागात आजही सात ते आठ दिवसात पाणी मिळते.या भागात मात्र केवळ कोरबू यांच्या या नियोजनामुळे २४ तास पाणी मिळत आहे. याबद्दल कोरबू यांना नागरिक धन्यवाद देत आहेत.यासाठी रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे,शबाब कोरबू, समीर शेख,वाहिद नाईकवाडी, सलीम शेख, दादा सावंत,हनिफ कोरबू,भैया नाईकवाडी, धोंडू कुंभार,अशपाक शेख, बबलू जमादार, निखिल पाटील आदींचे सहकार्य मिळाले असल्याचे कोरबू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रश्न सोडविण्यासाठी
इच्छाशक्तीची गरज
कुठलाही प्रश्न समाजात मिटत नाही असे
नाही तर ती मिटवण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे.यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘हर घर, हर नल योजना’खऱ्या अर्थाने आम्ही
गल्लीबोळात राबवत आहोत.
नन्नु कोरबू, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष,भाजप