राजेराय मठाच्या भक्तनिवासाचे काम युद्धपातळीवर सुरू ; अडीच कोटींचा खर्च अपेक्षित, भाविकांची होणार सोय
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट येथील श्री राजेराय मठाच्या अडीच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या भक्तनिवासाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या भक्तनिवासामुळे भाविकांना अल्प दरात राहण्याची सोय उपलब्ध होणार आहे. १८७७ साली हैदराबाद संस्थानातील शंकरराव राजेराय नामक एका जहागीरदारांनी श्री स्वामी महाराजांच्या सूचनेने या मठाची स्थापना केली. पुढे सद्गुरु बेलेनाथ महाराजांनी या मठाचा जिर्णोद्धार केला. हे मठ शहरात प्रसिद्ध आहे. तेव्हापासून या मठाकडून विविध समाजपयोगी उपक्रम तसेच सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
सध्या या मठामध्ये ४० खोल्या असून त्या भाविकांना अतिशय अल्पदरात दिल्या जातात. परंतु भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणखी ४५ खोल्यांचे नवीन भक्तनिवास बांधण्याचा निर्णय राजाराम मठ ट्रस्टच्यावतीने घेण्यात आला. त्याचे काम सध्या युद्ध पातळीवर जोरात सुरू असून येत्या सहा महिन्यात ही इमारत पूर्ण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शरदराव फुटाणे यांनी दिली.
दरवर्षी या मठामध्ये स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी, नवरात्र महोत्सव तसेच इतर सर्व धार्मिक सण परंपरा मोठ्या भक्तीप्रमाणे साजरे केले जातात त्यात भाविकही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. रोज सकाळी पहाटे काकड आरती नंतर अभिषेक केला जातो. तसेच ग्रामीण रुग्णालयातील गरीब रुग्णांसाठी मध्यान भोजन योजना सुरू केली आहे. भक्तांसाठी महाप्रसाद सेवा ही मोफत चालू आहे.याशिवाय गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी निवासाची व्यवस्था नसली की ते विद्यार्थ्यांना या मठामध्ये राहण्याची तसेच जेवणाची मोफत सोय करतो, असे अॅड.फुटाणे यांनी सांगितले.
भाविकांच्या देणगीतून या ट्रस्टचे कार्य सुरू असून ही इमारत देखील त्यांच्या निधीतूनच उभारली जात आहे.याचे सर्व श्रेय
भाविक भक्तांना जाते, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. याकामी ट्रस्टचे उपाध्यक्ष विकास दोडके,सचिव डॉ. किसन झिपरे, अॅड. अनिल मंगरुळे यांचेही सहकार्य मिळत आहे. यावेळी मोहन चव्हाण, दत्तात्रय मोरे, व्यवस्थापक सुदाम पाटील आदी उपस्थित होते.