बनावट हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री ; ‘बीआयएस’ने नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे येथे एकाचवेळी धाड टाकून केली कारवाई
मुंबई : सोन्याची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक आहे. तरीदेखील राज्यात काही ठिकाणी बनावट हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती भारतीय मानक ब्युरोला ( बीआयएस ) मिळाली. त्यानुसार ‘बीआयएस’ने नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे येथे एकाचवेळी धाड टाकून कारवाई केली आहे. यामध्ये नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे १ कोटी ५ लाखांचे २.७५ किलो दागिने जप्त करण्यात आले.
‘बीआयएस’ने ठरवून दिलेली गुणवत्ता आणि निकषांची पूर्तता न करताच राज्यात हॉलमार्कचा नकली होलोग्राम लावून सोन्याची दागिने विक्री करणाऱ्यांविरोधात ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. कारवाई अंतर्गत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धता प्रमाणपत्रासाठी हॉलमार्कचे उल्लंघन करणाऱ्यांवर राज्यात कारवाई केली जात आहे.
भारत सरकारने दागिन्यांवर हॉलमार्कच्या नियमांमध्ये केलेली सुधारणा १ जुलै २०२१ पासून देशभर लागू केली आहे. नवीन नियमांनुसार, दागिन्यांवर हॉलमार्किंगचे एकूण ३ गुण आहेत. पूर्वी हे चार ते पाच असायचे. तीन गुणांमध्ये हॉलमार्क, शुद्धता ग्रेड आणि ६ अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतात.