दिल्ली : आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘भाषणबाजी बंद करा आणि अदानी, एलआयसीवर बोला’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही कितीही चिखलफेक करत रहा, भाजपचं कमळ फुलतंच राहणार आहे. गेल्या सहा दशकांमध्ये काँग्रेसनं देशाचं वाटोळं केलं असून देशातील प्रश्नांवर काँग्रेसनं कधीही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही. काँग्रेसच्या शासनकाळात देशात खड्डेच खड्डे खोदले गेले होते, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू झाल्यानंतर विरोधकांनी ‘मोदी-अदानी भाई भाई’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षाच्या काळात भाजप सरकारनं सुरू केलेल्या योजनांचा पाढाच वाचून दाखवला. गेल्या चार वर्षांमध्ये देशातील तब्बल ११ कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचवण्यात आलेलं आहे. सामान्य माणसाच्या विकासासाठी कोट्यवधी लोकांचे बँक खाते उघडण्यात आलेत. आमचं सरकार देशातील अनेक प्रश्नांवर उत्तर शोधत असल्याचं सांगत मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर आरोप केल्यानंतर आता या मुद्यावरून विरोधक संसदेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू झाल्यानंतर विरोधकांनी अदानी प्रकरणात चौकशी करण्याची जेपीसीकडून (संयुक्त संसदीय समिती) चौकशी करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर गेल्या साठ वर्षात काँग्रेसनं देशाचं वाटोळं करून ठेवल्याचं प्रत्युत्तर पीएम नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिलं. काँग्रेस आणि भाजप खासदारांच्या जोरदार घोषणाबाजीत पीएम मोदींनी भाषण करत विरोधकांवर सडकून टीका केली आहे