अक्कलकोट, दि.२३ : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा यासह अन्य विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्कलकोट तालुक्याच्यावतीने सोलापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शेतकऱ्यांचे निवेदन नायब तहसीलदार विकास पवार यांनी स्वीकारले.
शेती पंपाला दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा, रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने अनुदान द्यावे.ज्या शेतकऱ्यांनी पिक विमाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत त्यांच्या खात्यावर तात्काळ पिक विमा जमा करावा,शेतकयांचे थकीत वीज बील पूर्णपणे माफ करावे, बुलढाणा येथे शेतकऱ्यांवरीत अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी खातेनिहाय चौकशी व्हावी, सोयाबीन व कापसाला १२ हजार रुपये हमीभाव मिळावा.सानुग्रह अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे यांनी दिली.
यावेळी तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, वजीर जमादार, विनायक जाधव, रत्नशील जैनजंगडे, चंद्रकांत रामशेट्टी,अविनाश कदरगे, मंजूर मत्तेखाने, रुद्रमनी हिरेमठ, प्रसाद आंबाडे, विजय मठ, अंगद देडे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
होते.