अक्कलकोट, दि.४ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट बाजार समितीच्या आवारात गुरांचा जनावर बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे, याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक शामराव दडस व सचिव मडीवाळप्पा बदोले यांनी केले आहे. यासाठी काही अटी व शर्ती ही लागू करण्यात आल्या आहेत.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा अंतर्गत
वाहतूक करताना जनावरांना २८ दिवसापूर्वी प्रतिबंधात्मक लस केलेले असणे आवश्यक आहे. सक्षम पशुवैद्यकीय अधिकारी यांचा लसीकरण केलेले प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे. बाजार परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात आलेला असावा. जनावरांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.दोन जनावरांमधील बांधण्याचे अंतर किमान ६ फूट असावे.निरोगी जनावरांनाच बाजारात प्रवेश देण्यात यावा या व अशा अन्य अटी यात टाकण्यात आल्या आहेत.
या आदेशाविरुद्ध पालन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार अक्कलकोट येथे सोमवारी दि.६ मार्चपासून हा बाजार सुरू होत आहे. तरी आपले जनावरे आणून मार्केट यार्ड मध्ये खरेदी विक्री करून सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.