अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील कर्जाळ येथे कुठलाही गाजावाजा न करता सोलापूर वन विभागाने वन उपज तपासणी नाकाचे लोकार्पण सोहळा होवून 3 महिने होत आली, अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेले नाही. दरम्यान दि.24 जानेवारी 2023 रोजी मुख्य वनसंरक्षक पुणे एन.आर.प्रविण यांच्या हस्ते तर उप वनसंरक्षक धैर्यशिल पाटील सोलापूर, सहा. वनसरंक्षक (रोहयो) एल.ए.आवारे, सहा.वनसंरक्षक (कॅम्प) बी. जी. हाके व वन परिक्षेत्र अधिकारी (रोहयो) डी. पी. खलाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर तीन महिने होत आली अद्यापही तपासणी नाका सुरु करण्यात आलेला नाही. याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
शासनाकडून एखादे उद्घाटन, लोकार्पण, भूमीपुजन झाले की ते होणार अशी जरी व्याख्या असली तरी याकरिता काही महिने लोटले गेले तर यास महत्त्व दिले जात नाही. असे अनेक उदाहरण समोर असतानाही अद्याप बंद अवस्थत तपासणी नाका असून उर्वरित जागेत वन विभागाचे संरक्षण भिंत, कर्मचारी-अधिकारी वसाहतीचे काम मात्र प्रगतीपथावर पहायला मिळत आहे.
या अगोदर देखील परिवहन विभागाने अक्कलकोट तालुका हा सीमाभागात असल्याने वागदरी, अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावरील बागेहळ्ळी फाटा या ठिकाणी आरटीओ चेकपोस्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. जागेची पाहणी झाली. मात्र ते लालफितीत अडकल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे. एकूणच चेकपोस्टला मुहूर्त लागण्यास तयार नाही. वन विभागाचा तपासणी नाका तयार आहे, मात्र कार्यान्वित नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून त्वरीत सुरु करण्याची मागणी पुढे येत आहे. अलीकडच्या काळात तस्करीचे प्रमाण वाढलेले आहे. यास पायबंद घालणे गरजेचे असून याकरिता तपासणी नाका दिवस-रात्र सुरु ठेवण्याची मागणी देखील पुढे येत आहे.