अक्कलकोट, दुधनी बाजार समितीच्या निकालावरून तालुक्याची दिशा ठरणार;थेट आरोप प्रत्यारोपांमुळे वाढली चुरस
(मारुती बावडे)
अक्कलकोट तालुक्यात सध्या दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत यात मिनी गोल्डन गॅंग ,भस्मासुर गॅंग आणि उचल्या गॅंग या शेलक्या शब्दांच्या वापरामुळे प्रचारातील चुरस आणखी वाढविली आहे त्यामुळे अक्कलकोट सध्या प्रचाराचा ‘हॉटस्पॉट ‘
बनला आहे.
कडक उन्हाळा आहे त्यात ४२ डिग्रीचे तापमान आहे अशात मतदार घामेघुम आहेत अशा या तीव्र गर्मीमध्ये बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आहेत.त्यात या वातावरणामध्ये रोज एकमेकांवर चिखलफेक सुरू असल्याने वातावरण आणखी हॉट बनत चालले आहे.या प्रतिष्ठेच्या आणि अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव
झाला.त्यानंतर ग्रामपंचायत व सोसायटीच्या निवडणुका वगळता तालुक्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका झाल्या नाहीत.त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांसाठी ही अग्निपरीक्षा ठरणार आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर म्हेत्रे हे तालुक्याच्या राजकारणात सध्या ॲक्टिव मोडवर आहेत.कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही निवडणुका जिंकून विधानसभेसाठी त्यांना पुढील रणनीती अवलंबवायची आहे त्यासाठी ते जीवाचे रान करत आहेत.अक्कलकोट बाजार समितीमध्ये मल्लिकार्जुन पाटील, दत्ता शिंदे, आनंद तानवडे, तुकाराम बिराजदार ,संजय देशमुख ,डॉ.सुवर्णा मलगोंडा यांच्यासारखी नवी तगडी टिम मैदानात उतरवून सत्ताधाऱ्यांना हम भी कम नही अशा पद्धतीने आव्हान दिले आहे. ‘अभी नही तो कभी नही’ अशा पद्धतीने प्रचार यंत्रणा हाकली जात
आहे.या ठिकाणी मागच्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून झालेला गैरकारभार,व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले हाल हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला आहे.दुसरीकडे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी विरोधकांवरती मिनी गोल्डन
गॅंग असा शब्द प्रयोग करून प्रचाराकडे सर्वांचे
लक्ष वेधून घेतले आहे.पाटील हे राजकारणात मुरब्बी आहेत.सहकारात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची त्यांना मोठी साथ
आहे संजीवकुमार पाटील आणि शिवानंद पाटील हे फुल्ल ॲक्टिव मोडवर आहेत.आमदार कल्याणशेट्टी हे पुढच्या राजकारणाच्यादृष्टीने संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.मिनी गोल्डन गँगचा आरोप पाटील यांनी केल्यानंतर बचाव पॅनलच्या मल्लिकार्जुन पाटील यांनी थेट पत्रकार परिषद घेत त्यांचा ‘भस्मासुर गॅंग’ असा उल्लेख करून प्रचारातील चुरस आणखी वाढवली आहे.यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी विरोधकांवर ‘उचल्या गॅंग’ अशी टीका टिप्पणी करत विरोधकांवर चांगले शरसंधान साधले आहे.या निमित्ताने सध्या रोज दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.दुधनी बाजार समितीकडे सर्वांचे लक्ष आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे वर्चस्व आहे या वर्चस्वाला शह
देण्यासाठी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी जोरदार फिल्डिंग लावली आहे.कोणत्याही परिस्थितीत सत्ता परिवर्तन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.सत्ताधारी म्हेत्रे गटाकडून दुधनी बाजार समितीत केलेल्या अनेक चांगल्या कामामुळे आणि पारदर्शक कारभारामुळे आमचा विजय निश्चित आहे,असा विश्वास म्हेत्रे गटाकडून व्यक्त केला जात आहे.ही निवडणूक म्हेत्रे परिवारासाठी आणि काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यांचा होम ग्राउंड आहे या होम ग्राउंडवर त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे ते पूर्ण ताकदीनिशी या मैदानात उतरले
आहेत. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे
जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे आमदार कल्याणशेट्टी हे देखील गनिमी कावा पद्धतीने या ठिकाणी रणनीती आखून दुधनीचा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रचारासाठी आणखी चार ते पाच दिवस शिल्लक आहेत सध्या प्रचार कार्य वेगाने पुढे जात आहे प्रत्येक पॅनलचे उमेदवार आणि नेतेमंडळी हे मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा करत आहेत काही मतदार परगावी आहेत तर काही विश्वासू मतदार जागेवर आहेत एकूणच काय दोन्ही गटासाठी या प्रतिष्ठेच्या या लढाया आहेत यात कोण जिंकणार आणि कोण हरणार हे पहावे लागणार आहे.
निकालातून तालुक्याची
दिशा ठरणार
पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत तत्पूर्वी लोकसभा निवडणूक होईल तत्पूर्वी जिल्हा परिषद ,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका होतील या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही निवडणुका म्हणजे या लिटमस टेस्ट असतील. या निवडणुकीत कोण जिंकतो यावर तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरेल,
अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.