अक्कलकोट, दि.४ : गुरुमंदिर अक्कलकोटतर्फे यंदा प्रथमच रामलीला मैदान ( नेरूळ ) मुंबई येथे आयुरुक्थ्य : महासोमयागाला उत्साहात प्रारंभ झाला आहे.हा याग सहा दिवस चालणार असून या निमित्त विविध विधी पार पडणार असल्याची माहिती संस्थाप्रमुख डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले महाराज यांनी दिली. जगाच्या कल्याणासाठी व शांतीसाठी तसेच कौटुंबिक सुख शांती लाभावी यासाठी वेगवेगळ्या यागाचे आयोजन या संस्थेमार्फत केले जाते.
यापूर्वी राज्यभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे सोमयाग झाले आहेत.यावर्षी मुंबईत आयुरुखत्य महासोमयाग आयोजित करण्यात आला आहे.अत्यंत पवित्र आणि भारलेले भक्तिमय वातावरण भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.साक्षात अक्कलकोट नगरीत स्वामीचरणी असल्याचा भाव अंतरंगी उमटत असल्याचे तेथील भाविकांनी सांगितले.सोमयागामध्ये सप्त सोम संस्था म्हणजेच सात प्रकारचे सोमयाग केले जातात ते सात प्रकार म्हणजे अग्निष्टोम,अत्यअग्निष्टोम,उक्थय,षोडषी, आप्तोर्याम, अतिरात्र व वाजपेय.या यागासाठी देशभरातून हजारों भक्तगण यज्ञ दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी करत आहेत व यज्ञ सेवेत सहभागही देत आहेत. सामुदायिक अग्निहोत्रामध्येही लोकांची उपस्थिती लक्षणीय आहे.मुख्य सोहळा ६ मे रोजी संपन्न होत असून या कार्यक्रमाला विविध मान्यवर येथे उपस्थित राहणार आहेत.या परिसरात स्वामीभक्त सुप्रसिद्ध चित्रकार शेखर साने चित्रित स्वामींची तैलचित्रे, संजय वेंगुर्लेकर यांच्यातर्फे स्वामींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून अजित कडकडे, मंदार पारखी, ऋषिकेश रानडे, अवधूत आळंदीकर, मनोज देसाई हे प्रसिद्ध कलाकार भक्तिसंगित सादर करत आहेत.समस्त भक्तजनांनी यज्ञ दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मठातर्फे करण्यात आले आहे.
अग्निहोत्र मानवी
कल्याणासाठी वरदान
अग्निहोत्र हे मानवी कल्याणासाठी लाभलेले खूप मोठे वरदान आहे.याचा प्रचार व प्रसार जगभर करण्यासाठी संस्थेमार्फत आम्ही विविध कार्यक्रम हाती घेत आहोत.सोमयाग हा एक त्यातला भाग आहे.महाराजांना मानणारे हजारो अनुयायी या ठिकाणी आहेत.त्यामुळे हा उत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे.
डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले,अध्यक्ष विश्व फाउंडेशन शिवपुरी