अक्कलकोट, दि.१९ : लवकरच पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे आपत्ती प्रवण क्षेत्रातील सर्व यंत्रणेने सज्ज राहावे, अशा सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत.मान्सूनपूर्व तयारी २०२३ या अंतर्गत अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.त्यावेळी
त्या बोलत होत्या.तहसीलदार बाळासाहेब सिरसट हे व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलताना आव्हाळे म्हणाल्या की, तालुक्यातील सर्व विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामध्ये आपत्ती काळात उपयोगात येणारे पर्यायी रस्ते व मार्ग यांचा आराखड्यामध्ये समावेश करावा,आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, २०२०,२०२१, २०२२ मधील आलेला अनुभव लक्षात घेऊन कार्यवाही करावी, रस्त्याकडच्या झाडाच्या उपाययोजनासाठी संबंधित विभागास पत्रव्यवहार करावा, बोरी नदीकाठच्या गावातील पुलाचे सर्वेक्षण करण्यासाठी बोरी पाटबंधारे शाखा अक्कलकोट यांना सूचना देण्यात आल्या.नदीकाठच्या गावातील ग्रामसेवक व तलाठी यांना लेव्हल मार्क करण्याबाबत ही सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका नियंत्रण कक्षामध्ये फोन ड्युटीस नेमलेले कर्मचाऱ्यांना कायम उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्यात आल्या. धोकादायक इमारती सर्वेक्षण करून रिकामे करून घेणे ,नजर अंदाज माहिती देताना प्रत्यक्ष शेतात जाऊन माहिती घेऊन माहिती देणे, अशा वेळी दूरध्वनी कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवू नये,यात्रा व बाजार याचे अद्यायावत माहिती देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.अफवा पसरू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आली.या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचे मॉक ड्रिल घ्यावे आणि आपत्ती काळात आरोग्य पथक तैनात करावे,अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या.यावेळी तालुक्यातील सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभावी अंमलबजावणी
केली जाईल
आपत्ती व्यवस्थापन २००५ मधील उपायोजनानुसार तालुक्यातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवू.मुळात एखादी घटना घडूच नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल.मान्सून पूर्वतयारी बाबत जिल्हास्तरावरून महत्त्वाच्या सूचना आल्या आहेत त्याची तंतोतंत अंमलबजावणी तालुक्यात केली जाईल.
बाळासाहेब सिरसट, तहसीलदार