राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर ”या” तारखे दरम्यान होणार प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी केल्यानंतर राम मंदिर जनतेसाठी कधी खुलं होणार,याची देशवासीयांना मोठी उत्सूकता आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, पुढील वर्षी १५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाण्याची शक्यता आहे.
अयोध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा यावर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. या पाच मांडवाच्या निर्मितीसाठी जवळपास १६० खांब असणार आहेत.
नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवलं जाईल. प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान कार्यक्रमाला हजर असतील. मूर्ती प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिर देशातील नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्येसाठी फार मोठा उत्सव असेल. देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्चुअली दाखवला जाईल. परदेशातील भारतीय नागरिकांनाही हा कार्यक्रम पाहता यावा, यासाठी हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याची तयारी सुरु आहे.