मुंबई : ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’, असा इशाराच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच धमकी देणारा मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याची टीका देखीप फडणवीसांनी केली आहे. फडणवीसांच्या या टीकेला धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडीला आज १ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त धनंजय मुंडे यांनी सरकारमधील सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडी सरकारच्या 1 वर्षाच्या कार्यकाळात कोरोनाचं मोठं संकट आलं. या संकटात जनतेच्या आरोग्याचा सांभाळ करत आणि विकासाची सांगड घातली. 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय, नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना 50 हजार रुपये, असे अनेक महत्वाचे निर्णय सरकारनं घेतल्याचं मुंडे यांनी आवर्जुन सांगितलं. केंद्राकडे राहिलेले GSTचे पैसे न मिळाल्यानं आर्थिक निर्बंध लादले. हे आर्थिक निर्बंध आणि कोरोनामुळे विकासाची गती मंदावल्याची खंतही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.