अक्कलकोट : (प्रतिनिधी)
दिपावली सुट्टीनिमित्त गेल्या दोन दिवसापासून प्रचंड गर्दी, गुरुवारी ‘आऊट ऑफ कंट्रोल’ रेकॉर्डब्रेक गर्दी, प्रशासन हतबल, भाविकांची गैरसोय, शासकीय यंत्रणा कोलमडली, म्हणेल त्या ठिकाणी पार्किंग, सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर दुतर्फा वाहने, शहरात बुधवार पेठेतील समाधी मठ ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसरात ट्राफिक जाम, हजारो वाहने लाखोंच्या संख्येने भाविक श्रीक्षेत्र अक्कलकोटमध्ये दाखल झाल्याने शासकीय यंत्रणेला अंदाज न आल्याने कोलमडल्याची स्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसात अक्कलकोटला येणारे-जाणारे वाहनांची संख्या पाहता १ लाखाहून अधिक असल्याचे टोल सूत्रांनी सांगितले आहे.
अक्कलकोट तीर्थक्षेत्री दत्त अवतार श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची नियमित वाढत चाललेली गर्दी यासह सलग सुट्ट्या असल्या की गर्दी होणारच अशी स्थिती निर्माण होत आहे.
राज्यासह परराज्यात, परदेशातून श्रींच्या दर्शनासाठी वाढत चाललेली गर्दी पाहता त्याप्रमाणे सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे. गुरुवारी पहाटेपासूनच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व समाधी मठ (चोळप्पा) येथे भाविकांनी एकच गर्दी केलेली होती. श्रींच्या दर्शनानंतर भाविकांनी महाप्रसादाकरिता अन्नछत्र मंडळात गर्दी केलेली होती.
दर्शनासाठी गुरुमंदिर बाळप्पा मठ, एकमुखी दत्त मंदिर, शिवपुरी-यज्ञनगर, श्री खंडोबा मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, राजेराय मठ, शमी विघ्नेश गणेश मंदिर आदी ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केलेली होती.
ती दिवसभर रात्रीच्या आरतीनंतरही कायम राहिली. वाढत चाललेली गर्दी गेल्या काही वर्षापासूनचा अंदाज गृहित पकडून शासकीय यंत्रणा कार्यरत राहणे गरजेचे होते. मात्र झालेल्या गर्दीवरुन तसे न झाल्याने याचा फटका भाविकांना बसला आहे.
भर रस्त्यावर अँटोरिक्षा, भाविकांची वाहने थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा व भाविकाचा वावर असुरक्षित बनला आहे. वटवृक्ष मंदिर दक्षिण प्रवेशद्वार ते अन्नछत्र मंडळ प्रवेशद्वार हा निमुळत अरुंद रस्ता दोन्ही बाजुनी व्यापार्यांची दुकाने यामुळे अधिकच अरुंद बनला आहे. यामुळे या मार्गावर भाविकांचा विशेषतः लहान बालके, वृध्द, भाविक महिलांचा जीव गुदरतोय.
यामुळे अप्रिय घटना नाकरता येत नाही. लाखो भाविकाचा ओघ चालू असताना नगरपालिका प्रशासन महसुल प्रशासनकडून आपत्ती निवारण करिता सुरक्षा यंत्रणा याबाबत कुठलीच दक्षता यंत्रणा कार्यन्वित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिवसो दिवस वाढणारी प्रचंड गर्दी यामुळे मंदिर परिसरात मास्टर प्लॅन मोठी रस्ते पादचारी मार्गाची नितांत गरज अधोरेखित झाली आहे.
दिवसेंदिवस अक्कलकोट तीर्थक्षेत्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ भाविकांची येणारी प्रचंड संख्या लक्षात घेता येणार्या वीस वर्षात वाढणारी प्रचंड गर्दी दृष्टिने मंदिर परिसराचे नियोजन करणे गरजेचे आहे.
अनेक सरकार आली गेली पण अदयापही एकाही शासनाने अक्ककलकोट तीर्थक्षेत्र पंढरपुर तुळजापुर च्या धर्तीवर मोठी रस्ते पदचारी मार्ग वाहनेपार्किग व्यवस्था नसल्याने भाविकाचा जीव गुदमरतोय, ऑटोरिक्षाचा घिरटा यामुळे वाहतुकीलाही बेशिस्त लागली आहे.
पोलीसांचा मोठा फौजफाटा मंदिर परिसरात वाहतुक सुरळित सुरक्षित करण्यासाठी मग्न दिसला पण मंदिर परिसरात चारचाकी अॅटोरिक्षा काही अंतरावर प्रवेशबंदी काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने भाविकाचा वावर असुरक्षित वाटत होता. मैंदर्गी रस्त्याकडे जाणारी जड वाहतुक पर्यायी मार्गाने मैंदर्गी मार्गाकडे वळविणे गरजचे होते. यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या वाहनाची प्रचंड गर्दी जड वाहतुकीमुळे प्रभावित होत होती.
वटवृक्ष मंदिर परिसराचा तातडीने विकास करण्यासाठी शासनाने अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करुन कालबद्ध विकास आराखडा राबवावा मोठा विकास निधी दयावा भाविकाचा सुरक्षित वावर होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले तातडीने उचलावीत अशी मागणी स्वामी भक्तांनी बोलताना व्यक्त केले.