ध्यास विश्वसार्ह बातमीचा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदीरास फुलांची सजावट

अक्कलकोट :  त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण महत्व असून या निमित्त अनेक भाविक येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरास सालाबादप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आले होते व सायंकाळी हजारो दिव्यांनी वटवृक्ष स्वामींचे मंदिर उजळून निघाले होते. वटवृक्ष मंदिर गाभारा, गणेश मंदिर, शेजघर, वटवृक्ष मंदिर परिसर इत्यादी मंदिराच्या सर्व भागात ही सजावट पुणे येथील स्वामी भक्त अप्पा वायकर यांनी केली होती.

याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी महाराष्ट्राच्या विविध भागातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत भक्तगण दर्शनाकरिता येत असत परंतू यंदा कोरोना प्रादूर्भावामुळे शासन आदेशानुसार परगावाहून येणारे पालखी व दिंडी सोहळे रद्द करून प्रत्येक दिंडीतील पाच ते दहा भाविकांनी आपल्या डोक्यावर दिंडीच्या पादूका घेवून स्वामीनामाचा गजर करीत स्वामींच्या भेटीला आले होते.  दर पौर्णिमेला अक्कलकोटची वारी करून स्वामी दर्शन घेणारे हजारो भाविक कोरोना लॉकडाऊनमुळे मागील आठ पौर्णिमेपासून स्वामी दर्शनाला वंचित होतेे. राज्यातील मंदीरे उघडल्यानंतर ही पहिलीच पौर्णिमा असल्याने त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहूर्तावर स्वामींचे दर्शन घेता आल्याने अनेक भाविकांनी स्वामी दर्शनाचे समाधान आनंदमय असल्याचे सांगीतले.

दरम्यान आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता स्वामींची काकड आरती पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुुजारी यांच्या हस्ते व चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. काकड आरती नंतर पहाटेपासून भविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. दिवसभर सर्व स्वामी भक्तांना टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील विविध परिसरात भाविकांना सॅनिटायझरची सोय करण्यात आली होती. येणारा प्रत्येक भाविक हा मंदीर समितीच्या सेवेकऱ्यांच्या सुचनेची दखल घेवून सॅनीटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करून स्वामींचे दर्शन घेतले. सर्व भाविकांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त पदाधिकारी व कर्मचारी सेवक वर्गाने परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!