ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तापमानात होणार घसरण तर राज्यात वाढणार थंडी !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरातील अनेक राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत असून राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात आकाश निरभ्र होत असून, पहाटे गारठा वाढला आहे. दुपारी मात्र ऊन असल्याचे दिसून येत आहे. पहाटे तुरळक धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ-घट होण्याची शक्यता आहे.

तर आकाश निरभ्र झाल्याने पुण्यात गारठा वाढला आहे. पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये हा गारठा वाढणार असून, किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर वेधशाळेत किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शहर आणि उपनगरांत सूर्यास्तानंतर हवेतील गारठा वाढत आहे. पहाटेपर्यंत हा गारठा सध्या कायम असल्याचे जाणवते. त्यामुळे गेल्या आठवड्यात १७ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला किमान तापमानाचा पारा आता १५.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!