मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत आहे. नुकतेच मुंबई येथील बोरिवलीच्या एम के भाजीमार्केटमध्ये लसूण चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून लसूण चोरी करत असल्याच्या रागातून ४६ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. पंकज मंडल असे मृत व्यक्तीच नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली भाजी मंडईत पंकज मंडल हे भाजीची पोती लोड करणे आणि उतरवणे अशी काम करत होता. मार्केट परिसरातच ५०० मीटरवर त्याचा मृतदेह आढळला. मंडल गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून लसूण चोरी करत असल्याचा संशय घनश्याम खाकरोडियाला होता. मात्र त्यांच्याकडे ठोस पुरावे नव्हते. मात्र खाकरोडीया आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी ६४०० रुपये किमतीची २० किलो लसूण असलेली पोती चोरल्याप्रकरणी मंडलला पकडले. या प्रकरणी घनश्याम खाकरोडीया या लसूण विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी रात्री या सर्वांनी मंडलकडे याबाबत चौकशी केली. मंडलने चोरीची कबुली दिली आणि लसूण चोरीचे पैसे देण्याचंही मान्य केलं. मात्र दुकानमालकाने मंडलला रागात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बेदम मारहाणीनंतर अर्धमेला अवस्थेत मंडल खाली कोसळला त्यानंतर घनश्याम आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरून निघून गेला. तेथे उपस्थित इतर लोक मंडलच्या मदतीला आले आणि पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मंडल त्यांना मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दुकानदाराला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.