ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शक्तिशाली भूकंपाने चीन हादरले : १२७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

वायव्य चीनमध्ये सोमवारी मध्यरात्री उशिरा आलेल्या शक्तिशाली भूकंपात १२७ जणांचा मृत्यू झाला, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले. ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर जवळपास ३२ हून अधिक लहान-मोठे धक्के जाणवले, गत १३ वर्षांतील या सर्वात भीषण भूकंपात शेकडो घरे जमीनदोस्त झाली. भूकंपामुळे लोकांना संपूर्ण रात्र कडाक्याच्या थंडीत उघड्यावर जागून काढावी लागली. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी बचाव अभियानाचे आणि जखमीवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. सोबत भूकंप आणि हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित प्राधिकरणाला दिले आहेत.

चीनच्या गांसू आणि किनघई प्रांताला भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. रात्री ११ वाजून ५९ मिनिटाच्या सुमारास आलेल्या भूकंपामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू लियुगोठ शहरामध्ये जमिनीखाली १० किमीवर होता. या भूकंपानंतर मंगळवारी सकाळी ९ वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास शिनजियांग उइगर स्वायत्त भागात भूकंपाचा दुसरा धक्का बसला. रात्रीच्या भूकंपामुळे गांसुमध्ये १०५, तर किनघईमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. जिशिशानमध्ये ६, ३८१ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शक्तिशाली भूकंपानंतर आतापर्यंत ३२ हून अधिक धक्के जाणवले आहेत. यापैकी सर्वात मोठ्या धक्क्याची तीव्रता ४.० इतकी होती, अशी माहिती प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते हान शुजुन यांनी दिली.

भूकंपामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक भागांतील वीज यंत्रणा व दूरसंचार सेवा कोलमडली आहे. भूकंपामुळे ‘पीली नदी’वरील एका पुलाला भेगा पडल्याची माहिती परिवहन मंत्रालयाने दिली. भूकंपग्रस्त भागात कडाक्याच्या थंडीतही ५८० बचाव कर्मचारी, १२ श्वान आणि १० हजारांहून अधिक उपकरणाच्या मदतीने बचाव अभियान राबवले जात आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी व्यापक पातळीवर बचाव अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!