ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उजनीच्या पाण्याची वाट अक्कलकोटसाठी ‘खडतर’

पाण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष, पाटबंधारेचे प्रयत्न सुरूच

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सध्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात एकरूपखच्या पाण्याचा विषय गाजत आहे परंतु उजनीचे पाणी हे कुरनूर धरणात पोहोचेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली असून उपलब्ध माहितीनुसार पाण्याची ‘वाट’ अतिशय ‘खडतर’ मानली जात आहे असे असले तरी पाटबंधारे विभाग मात्र यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

यामुळे कुरनूर धरण व परिसरातील शेतकऱ्यांसह तालुक्याचे लक्ष या पाण्याकडे लागले आहे.१९९६ साली मंजूर झालेल्या या योजनेचा अंतिम टप्पा यावर्षी पूर्ण झाला आहे त्यात दर्शनाळ कालव्यासंबंधी काही कामे अजूनही अपूर्ण आहेत दायित्व मंजूर नसल्यामुळे काही काम करता आले नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे.त्यामुळे पाणी पुढे वेगाने सरकण्यास अडचणी येत आहेत राज्य सरकारने दायित्व मंजूर केल्यास पुढच्या वर्षी पाणी वेगाने येण्यास अडचण येणार नाही.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दर्गनहळळी वितरण कुंडापासून तीन किलोमीटर पाणी पुढे सरकले आहे.
हरणा नदीत पाणी पडण्यास अद्याप सात किलोमीटरचे अंतर बाकी आहे ते पूर्ण होण्यास चार ते पाच दिवसाचा कालावधी लागू शकतो.हे पाणी हरणा नदीत पडल्यानंतर पुन्हा पुढे नदी वाटे १४ किलोमीटर अंतर सरकून कुरनूर धरणामध्ये पाणी येणार आहे.त्यासाठी पुन्हा सात ते आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुळात पाण्याचा दाब उजनी धरणावरूनच कमी असल्यामुळे आणि योजनेतील काही तांत्रिक अडचणी पुढे येत असल्यामुळे पाणी पोहोचण्यास उशीर होत आहे.उजनीच्या पाण्याबद्दल सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे कुरनूर धरणामध्ये देखील केवळ २० ते २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचा लाभ होईल आणि यावर्षीची परिस्थिती काही अंशी सुधारेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे परंतु सोडलेले उजनीचे

पाणी आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल का याबाबत चर्चा सुरू आहे.कारण उजनी धरणामध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे यावरून उजनी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे तरच ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल अन्यथा यावर्षी एकरूख उपसा सिंचन योजनेची एक प्रकारे चाचणी झाली असे म्हणावे लागेल.

दक्षिण तालुक्याला काही अंशी दिलासा
एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात दर्गनहळळी आणि रामपूर हे दोन तलाव भरतील त्यानंतर हे पाणी कुरनूरकडे मार्गस्थ होणार आहे यावर्षी मात्र पाण्याचा दाब कमी असल्याने दर्गनहळळी ५५ टक्के भरले आहे आणि रामपूरमध्ये १५ टक्के पाणीसाठा झाला आहे याचा काही अंशी फायदा दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

बोरी नदीकाठच्या गावांवर जलसंकट
दरवर्षी कुरनूर धरण शंभर टक्के भरल्यावर आठ कोल्हापुरी बंधाऱ्यांत पाणी सोडले जाते मात्र यावर्षी कुरनूर धरणातच २० ते २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणी सोडणे मुश्कील आहे त्यामुळे आठ कोल्हापुरी बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याची अडचण निर्माण होणार आहे यामुळे नदीकाठच्या गावांवरील सार्वजनिक नळ पुरवठा पाणीपुरवठा करणाऱ्या गावांना देखील याचा फटका बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!