अक्कलकोट : प्रतिनिधी
स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून जास्तीचा दर आकारण्यात येणाऱ्या लॉज मालक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिला आहे.
स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी झालेली वाढती गर्दी आणि उपलब्ध सोयी सुविधा याचा विचार करता पोलीस प्रशासनाने गुरुवारी अक्कलकोट शहरातील लॉज धारकांची बैठक घेतली. गेल्या एक वर्षापासून पोलीस प्रशासनाकडून सातत्याने अशा प्रकारच्या बैठका घेण्यात येत आहेत या बैठकीत वारंवार सूचना दिल्या जात आहेत काही लोक त्याची अंमलबजावणी करतात काही लोक करत नाहीत अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ ही बैठक घेतली. स्वामी समर्थांमुळे अक्कलकोटचे नाव जगभर पसरत आहे अशावेळी अक्कलकोटचे नाव खराब होऊ नये याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. या ठिकाणी येणारा भाविक हा राज्यभरातून येत असतो. बैठकीमध्ये त्यांनी परगावच्या भाविकांना कोणत्याही प्रकारे निवास व्यवस्थेचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अशी सूचना त्यांनी केली.श्री दत्त जयंती ,नाताळ , वर्षा अखेर , नुतन वर्षाचे आगमन व शासकीय सुटटया या अनुषंगाने अक्कलकोटमध्ये पुढचे चार-पाच दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे या पार्श्वभूमीवर उत्तर पोलीस ठाणे येथे अक्कलकोट शहरातील लॉज धारकांची बैठक घेण्यात आली.
सर्व लॉज धारक हे निर्धारित दर आकारातील जास्तीचा दर आकारण्यात येऊ नये,जास्तीचा दर आकारण्यात येणाऱ्या लॉज मालक यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लॉजचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावेत, लॉज धारक हे पार्किंग व्यवस्था करतील, ज्या लॉज धारकांकडे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत ते सीसीटीव्ही कॅमेरे बसवतील, लॉज धारक नोंदवही अद्यावत ठेवतील अशा सूचना सर्व लॉज धारकांना देण्यात आल्या, असे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.या बैठकीला शहरातील लॉजधारक उपस्थित होते.