ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली माजी आ.पाटील यांची निवासस्थानी भेट !

अक्कलकोटच्या राजकारणावर झाली चर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

लोकसभा तसचं विधानसभा निवडणुकीत ताकदीनं उतरुन भाजपाचे उमेदवार निश्चितचं निवडून आणू, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली.भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी, बूथ तसचं केंद्र प्रमुख प्रमुखांशी कार्यकर्त्यांशी लोकसभा तसचं विधानसभेच्या आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा केली. रात्री ९ वाजता त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन आवर्जून भेट घेतली.

यावेळी भाजपाचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची उपस्थिती होती. यावेळी स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संजीवकुमार पाटील यांनी बावनकुळे यांचं शाल तसचं पुष्पगुच्छ देऊन पाटील परिवाराच्या वतीनं स्वागत केले.दरम्यान यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रकृती बाबत आस्थेनं विचारपूस केली. तसचं श्री. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यासह येणाऱ्या लोकसभा तसचं विधानसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली.

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली. सुमारे दहा ते बारा कोटी रुपये कारखाना चालू करण्यासाठी खर्च करण्यात आले असून, शासनाकडून मदतीची गरज आहे, असं यावेळी सिद्रामप्पा पाटील यांनी सांगितलं. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ही सिद्रामप्पा पाटील यांनी या साखर कारखान्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.यावेळी बावनकुळे यांनी स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला आवर्जून मदत करु, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निश्चितचं बोलू अशी ग्वाही देताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर या संदर्भात पाठपुरावा करण्याची जबाबदारी देऊ, असं देखील ते म्हणाले.दरम्यान येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ताकदीनं उतरुन भाजपाचे उमेदवार निश्चितचं निवडून आणू, मतदार संघात फिरुन राज्य तसचं केंद्र शासनानं लोकहिताची केलेली कामं घराघरापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही यावेळी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली. यावेळी बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील पुस्तक सिद्रामप्पा पाटील यांना भेट दिलं. यावेळी पाटील परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!