ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दस्तनोंदणीच्या कामात नव्या वर्षात आणखी पारदर्शकता येणार

रेडी-रेकनरमधील दराबरोबरच अक्षांश-रेखांक्ष पाहायला मिळणार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

दस्तनोंदणीच्या वेळीच त्या जागेच्या रेडी-रेकनरमधील दराबरोबरच त्या जागेचा अक्षांश-रेखांक्षदेखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यापुढे आता दाखविलेली जमीन, खरेदी करीत असलेली जमीन यांची खात्री होण्यास मदत होणार आहे.राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.

एखादी जमीन खरेदी करीत आहात. जागा मालकाने अथवा एजंटने ती दाखविली आहे. दस्त नोंदणीच्यावेळी दाखविलेली जागा त्याच ठिकाणी आहे.जशी दाखविली, तशाच आकाराची ती आहे का, अशा अनेक शंका उपस्थित होतात,परंतु आता घाबरण्याची गरज नाही.त्यासाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक) यांच्याबरोबर करार केला आहे.

‘एमआरसॅक’ यांच्याकडे राज्यातील गावनिहाय उपलब्ध असलेल्या गट नंबरनिहाय जीआयएस नकाशे रेडी-रेकनरची लिंक करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहर व गावातील सरकारी, खासगी जागांचे रेडी-रेकनरमधील दर ‘जिओ पोर्टल’वर एका क्लिकवर पाहावयास मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर ती जागा नेमकी कुठे आहे, तिचे कोर्डींनेट्‌स (अक्षांश-रेखांक्ष) मिळणार आहे. दाखविलेली जागा एक आणि दस्तनोंदणी केल्यानंतर ती जागा निघाली दुसरीकडेच, अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.२२ जिल्ह्यांचे रेडी-रेकनर अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे.प्रत्येकाला शहर, गाव, तालुका निहाय जमिनींचे रेडी-रेकनरमधील दर मिळावेत,यासाठी हे पोर्टल विकसित केले आहे. त्यासाठी तीन टप्पे केले आहेत.शहर, शहरालगतचे प्रभाव क्षेत्र आणि ग्रामीण भाग,असे हे तीन टप्पे आहेत.‘एमआरसॅक’ची मदत घेऊन त्यांच्याकडील नकाशे आणि रेडी-रेकनरमधील दर यांचे एकत्रीकरण येत आहे. आतापर्यंत राज्यातील शहर महापालिका असलेल्या २२ जिल्ह्यांचे रेडी-रेकनर अपलोड करण्याचे काम झाले आहे. उर्वरित १३ जिल्ह्यांची माहिती अपडेट करण्याचे काम बाकी आहे. येत्या वर्षात हे काम पूर्ण होईल,असे नोंदणी मुद्रांक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्यवहारात आणखी पारदर्शकता येईल !
दस्त नोंदणीच्या कामात या प्रक्रियेमुळे आणखी पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक होणार नाही.शासन दर वर्षाला याबाबतीत अलर्ट राहत आहे.जेणेकरून कोणाचीही फसवणूक होऊ नये याची काळजी शासन स्तरावर आणि प्रशासन पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे त्या विचाराचाच हा एक भाग आहे.
– डी. डी. चाटे, दुय्यम निबंधक अक्कलकोट

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!