अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सद्यस्थितीत शहराच्या ठिकाणी शैक्षणिक प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे.सधन व्यक्ती शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने व सुविधा पुरवितात. याउलट ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव असताना उद्योजक उमेश पाटील यांनी चपळगावसारख्या भागात शैक्षणिक संस्थेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय कार्यात हातभार लावले आहेत.असे हात दुर्मिळ असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
चपळगांव (ता.अक्कलकोट) येथील रिणाती इंग्लिश स्कुल व स्व.संतोषदादा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकवठे होते.तर व्यासपीठावर म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी,चेअरमन उमेश पाटील,राजेंद्र लांडगे, उपसभापती अप्पासाहेब पाटील, स्वाती लांडगे,रोहिणी पाटील, बाळासाहेब मोरे,के.बी.पाटील, सिध्दाराम भंडारकवठे, महेश पाटील,बसवराज बाणेगांव,अंबणप्पा भंगे,ब.रे.मठदेवरु,स्वामीनाथ हरवाळकर,राहुल काळे, मुख्याध्यापक सुभाष बिराजदार,मुख्याध्यापक दिगंबर जगताप आदी उपस्थित होते.प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पत्रकार दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान यावेळी संस्थेच्यावतीने करण्यात आला. गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, सद्यस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजीचे महत्त्व वाढत चालल्यामुळे पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत चालला आहे.ग्रामीण भागात इंग्रजी शाळेची निर्मिती झाल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा त्रास कमी झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती,सामाजिक,कृषी, पाश्चात्य संस्कृती आदी विषयांवर विविध कलाविष्कार सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.