ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार कल्याणशेट्टींची जबाबदारी वाढणार तर लोकसभेसाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंना संधी !

मारुती बावडे : वार्तापत्र

सध्या देशात काँग्रेसची सत्ता आणणे हेच काँग्रेसच्या नेते मंडळी समोरचे आव्हान आहे तर सत्ता टिकवणे हे भाजप समोरचे आव्हान राहणार आहे अक्कलकोट मतदार संघाचा विचार करता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी पूर्वीचे मताधिक्य कायम राखण्याबरोबरच जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपचा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी वाढली आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा थांबली असून पहिल्यांदा लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका असे तरी चित्र सध्या दिसत आहे.त्यादृष्टीने आता भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख एकमेकांचे विरोधी पक्ष तयारीला लागले असून त्यादृष्टीने संभाव्य उमेदवारांची चर्चा आणि रणनीती ठरविण्यात ते व्यस्त आहेत. यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठकांनाही वेग आला आहे.अक्कलकोट तालुक्याच्या दृष्टीने विचार केल्यास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची परीक्षा आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पक्षाला उभारी देण्याची मोठी संधी अशा प्रकारचे चित्र निर्माण झाले आहे.मागच्या वेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली होती ती आघाडी पुन्हा भाजप कायम राखणार का हा एक प्रश्न आहे आणि ही आघाडी तोडून काँग्रेस वर्चस्व मिळवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी अक्कलकोटला भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.पक्ष पातळीवर सर्व वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांच्या चर्चा व बैठका सुरू आहेत.त्यादृष्टीने मागच्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झाली.या बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे ही समजते. या दौऱ्यात बावनकुळे यांनी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची खास भेट घेत निवडणुकी संदर्भात चर्चा केली होती. या निवडणुकीत भाजपकडून सध्या तरी उमेदवार फिक्स नसल्याची चर्चा आहे त्यामध्ये प्रामुख्याने विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे नाव आघाडीवर आहे त्यांच्याच नावाला वरिष्ठ पातळीवर हिरवा कंदील असल्याची चर्चा आहे.

याव्यतिरिक्त ही जागा रिपाईला सुटल्यास प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी मिळू शकते.रिपाईने शिर्डी आणि सोलापूर या दोन जागांची मागणी केली आहे भाजपने ही मागणी मान्य केल्यास या ठिकाणच्या उमेदवारामध्ये ऐनवेळी बदल होऊ शकतो.त्याशिवाय माळशिरसचे आमदार राम सातपुते,अमर साबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे परंतु या सर्व चर्चा जर तरच्या आहेत. त्यावर अधिकृत पक्षाकडून शिक्का मोर्तब कोणाच्याही नावाबाबत झालेले नाही.उमेदवारी ठरवताना आता जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाबाबत जवळपास एकमत झाले असून उमेदवारीची घोषणा होणे केवळ बाकी आहे.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वीच आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही आता प्रणिती शिंदे या उमेदवार असतील असे सांगितले आहेत त्यामुळे प्रणिती शिंदे यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे.त्यादृष्टीने वातावरण निर्मिती केली जात आहे. यावेळी खास करून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.कारण सध्या जिल्ह्याची काँग्रेसची स्थिती बघितली तर म्हेत्रे हे एकमेव ताकदवान नेते उरले आहेत जे काँग्रेसला विजयाकडे घेऊन जाऊ शकतात यासाठी अक्कलकोट मतदार संघ हा देखील महत्त्वाचा भाग आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर,सोलापूर शहर या परिसरातून काँग्रेसला मताधिक्य देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.मागच्यावेळी अक्कलकोट तालुक्यातून भाजपाला मताधिक्य मिळाले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीचेही चित्र बदलले होते.यावेळी सुद्धा तसे पाहिले तर विधानसभा निवडणुकीची एक प्रकारे ही रंगीत तालीमच सुरू झाली आहे.या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून असते.जरी ही निवडणूक देशपातळीवरची असली तरी यातून मतदारसंघाचा कल स्पष्ट होऊ शकतो यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात.सध्या तरी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे जातील असे वातावरण आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या एकत्र होतील अशी पण चर्चा आहे पण तूर्तास तरी लोकसभा निवडणुकीच्या हालचाली अधिक गतिमान दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!