नेपाळ : वृत्तसंस्था
नेपाळच्या मध्य पश्चिममधील डांग जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशीरा नदीवरील पूलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळलेल्या बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भालुबांग येथे हा अपघात घडला. बांकेच्या नेपाळगंज येथून काठमांडूला जाणारी प्रवासी बस पुलावरून पलटी होऊन राप्ती नदीत कोसळली. नेपाळमधील भालुबंग येथील एरिया पोलीस कार्यालयातील मुख्य पोलीस निरीक्षक उज्ज्वल बहादूर सिंग यांनी बस अपघात कसा घडला याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली आहे. ज्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे.
उर्वरीत मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, बसमधील जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ओळख पटलेल्या मृतांमध्ये असलेल्या दोन भारतीयांपैकी एकाच नाव योगेंद्र राम (वय 67) ते मुळचे बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहे. दुसऱ्याचे नाव मुने (वय 31) तो मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहे. नेपाळ प्रशासनाने भारतीय प्रशासनाशी संपर्क साधला असून त्यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे उज्ज्वल बहादूर सिंह यांनी सांगितले.