ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अयोध्येवर १० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अत्याधुनिक ड्रोनसह १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रामनगरीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय अयोध्येला राज्य व केंद्रीय सुरक्षा दलांच्या ३५ हजार जवानांचा वेढा पडणार आहे.

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांतकुमार यांनी सांगितले की, अयोध्येत अत्याधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. प्रतिष्ठापनादिनी संपूर्ण अयोध्या शहरावर अत्याधुनिक ड्रोनद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल. याशिवाय एक अँटी-ड्रोन यंत्रणादेखील उभारण्यात येत आहे. अयोध्येच्या आकाशात सुरक्षा यंत्रणेचे ड्रोन वगळता इतर कोणतेही ड्रोन उडू नये, यासाठी ही अँट्री-ड्रोन यंत्रणा आहे. एखाद्या अनधिकृत ड्रोनने उड्डाण केले तर या यंत्रणेद्वारे त्याची माहिती लगेचच सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळेल. यानंतर या अनधिकृत ड्रोनवर सुरक्षा यंत्रणेचे नियंत्रण प्रस्थापित होईल.

सुरक्षा यंत्रणा हे ड्रोन हवे तसे उडवून आपल्या सोयीनुसार उतरवू शकतात. ड्रोन चालकाचे त्याच्यावर अजिबात नियंत्रण नसेल. याशिवाय अयोध्येत १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. प्रामुख्याने राम मंदिर परिसरातील कॅमेरे हे जगातील अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. सध्या अयोध्येत उत्तरप्रदेश पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असला तरी केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान देखील सुरक्षेसाठी तैनात असतील. प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी ३५ हजार जवानांच्या हाती अयोध्येची सुरक्षा असेल. यामध्ये १०० अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ३०० निरीक्षक, ८०० उपनिरीक्षकांचा समावेश आहे. एटीएफ, एसटीएफचे सुरक्षा कर्मचारीदेखील अयोध्येत पोहोचले आहेत. शरयू नदीत बोटीद्वारे गस्त घालण्यात येणार असून, नदीच्या दोन्ही काठांवर सुरक्षा जवान तैनात असतील. २० जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार असून, या सोहळ्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, महानायक अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसह ७००हून अधिक लोकांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!