ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्राने कृषी धोरणात बदल करण्याची गरज – शरद पवार

मुंबई : वृत्तसंस्था

केंद्र सरकारने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे. त्यातील फेरबदलामुळे शेतकरी अडचणीत येतात. ब्राझिल या देशात गरजेनुसार उसापासून साखर किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. विमानाचे इंधनसुद्धा उसापासून बनवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. याबाबींचा केंद्र सरकारने विचार करणे गरजेचे आहे. केंद्राने निर्यात घोरणात बदल करण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाल्याचेही पवार यांनी सांगितले.

जुन्नर तालुक्यातील शिरोली-धालेवाडी येथे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सुमित्रा शेरकर, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाव्यसाहेब दांगट, शरद सोनवणे, नगरसेवक विशाल तांबे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, भाजपच्या नेत्या आशा बुचके, बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, देवदत्त निकम, किशोर दांगट, अनिल मेहेर, अनंतराव चौगुले, दिलीप बाम्हणे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, गुलाब पारखे, देवराम लांडे, मोहित ढमाले, अंकुश आमले आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, मी कृषिमंत्री असताना शेतीमुळे विकासदर चांगला राखण्यात यश आले. परंतु आताच्या सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लादल्यामुळे कांदा बाजारभावात मंदी आल्याने पर्यायाने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. शेती व शेती उद्योगामध्ये राजकारण आणू नये. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर वर्षभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारला शेतकऱ्याच्या विरोधात केलेले काही कायदे बदलणे भाग पडले. सत्यशिल शेरकर व त्यांच्या संचालक मंडळाने विघ्नहरची वाटचाल योग्य दिशेने सुरू ठेवली असल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!