मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर धरणे आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पंढरपुरातील तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करा तसेच त्यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली.
अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि डॉ. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र फौजदारी याचिकांची न्यायमूर्ती रेवते मोहिते डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने २२ जानेवारील सुनावणी निश्चित केली. मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन आणि उपोषण करण्यावर ठाम आहेत. या आंदोलनाला राज्यातून सुमारे २ कोटी मराठा समाज दाखल होण्याची वलग्ना केली जात आहे. त्याचा ताण मुंबई शहरावर पडून सर्व यंत्रणा कालमोडू शकते, अशी भीती याचिकेत व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
डॉ. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मंगळवारी सकाळी ही याचिका न्यायमूर्ती रेवते मोहिते डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाच्या निर्देशनास आणून देत त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी २२ जानेवारीला निश्चित केली आहे.